विद्यार्थ्यांनो, नव्या बदलास सक्षमपणे सामोरे जा: प्रा. डॉ. पेडणेकर ; सोलापूर विद्यापीठाचा अठरावा दीक्षांत समारंभ उत्साहात
सोलापूर, दि.12- केवळ पदवी प्रमाणपत्रावर नोकरी मिळणार नाही. विविध कौशल्ये आत्मसात केल्यानंतरच नोकरी मिळू शकेल. विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत. आता जग वेगाने बदलत आहे, त्यामुळे या नव्या बदलास सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्षमपणे तयार राहावे आणि येणाऱ्या आव्हानांना तोंड देत संकटाशी सामना करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले.
सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा दीक्षांत समारंभ कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. पेडणेकर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. डॉ. राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणीक शाह व विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एकूण 17 हजार 191 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आले. याचबरोबर 50 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 57 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखेच्या अधिष्ठातांनी स्नातकांना पदवी देण्याची विनंती केल्यानंतर कुलगुरूंनी पदवी बहाल करत असल्याचे घोषित केले. विद्यापीठाच्या विकासाच्या अहवालाचे वाचन कुलसचिव योगिनी घारे यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ. अंजना लावंड यांनी करून दिला.
प्रा. डॉ. पेडणेकर म्हणाले की, पदवी घेऊन बाहेर पडताना विद्यार्थ्यांनी स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. आज आपण कुठे आहोत? आपणाला कुठे जायचे आहे? त्यासाठी कोणते ज्ञान आणि स्त्रोत मिळविणे गरजेचे आहे?जे यश तुम्हाला मिळवायचे आहे, ते तुम्ही कशा पद्धतीने साध्य करू इच्छिता? या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी शोधावीत. ती शोधली आणि आत्मपरीक्षण केले तर पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकेल. कोविडच्या कालखंडाने आपणाला खूप काही शिकवले असे सांगून डॉ. पेडणेकर यांनी या पुढच्या काळात डिजिटल क्षेत्रामध्ये 40 ते 50 टक्के नोकऱ्या असणार आहेत, असे सांगितले. खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करणारे पूर्वी दोन ते तीन नोकऱ्या बदलत असत. या पुढच्या काळात दोन ने तीन करिअर बदलावे लागतील, अशी तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी, असे ही ते म्हणाले. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाविषयी बोलताना डॉ. पेडणेकर यांनी या विद्यापीठाने कमी वयामध्ये कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोठी उंची गाठल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, आजचा काळ हा संक्रमणाचा काळ आहे. या काळामध्ये आपणाला नेमके काय साध्य करावे लागेल, याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. मानवी विकास हे आपले अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. आपण काय मिळवतो, यापेक्षा इतरांना काय देतो हे यामध्ये महत्त्वाचे आहे. मनुष्यबळ हेच भारताचे सामर्थ्य आहे, त्यामुळेच आपला देश जगातील सर्वश्रेष्ठ देश ठरू शकतो. मनुष्यबळ विकासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. दर्जेदार शिक्षण महत्त्वाचे असून आपले आरोग्य सांभाळणे हे देखील महत्त्वाचे आहे. यापुढच्या काळात येणारी आव्हाने मोठी असणार आहेत, ती आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांनी अंगी बाळगावे आणि कधी -कधी अपयश मिळाले तरी त्यातूनच पुढे जाण्याचा मार्ग शोधावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी पावणे अकरा वाजता दीक्षांत मिरवणूक निघाली. यामध्ये परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर हे ज्ञानदंड हाती घेऊन अग्रभागी सहभागी झाले होते. यामध्ये मान्यवरांसह पदवी स्वीकारणारे स्नातक दीक्षांत सोहळ्यासाठीचा विशेष बाराबंदी पोशाख परिधान सहभागी झाले होते. यामुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये एक उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यापीठ गीतानी कार्यक्रमाची सुरुवात झाली तर राष्ट्रगीताने सांगता झाली. या सोहळ्यासाठी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, सुवर्णपदकाचे देणगीदार, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. श्रुती देवळे यांनी केले. आभार कुलसचिव योगिनी घारे यांनी मानले.