अक्कलकोट,दि.१९: सोलापूर जिल्ह्यातील कोव्हिडं १९ साठीच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी अपुऱ्या पडत असलेली समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केलेली आहे.
त्यांनी त्यांचे या गैरसोयी विषयी लक्ष वेधलेल्या पत्रात म्हंटले आहे की मागील सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून या कोव्हिडं १९ च्या साथीने नागरिक त्रस्त आहेत त्यातच मागील दोन महिन्यांपासून या रुग्णांच्या संख्येत जिल्ह्यात खासकरून ग्रामीण भागातसुद्धा मोठी वाढ दररोज नोंदविली जात आहे.पण यासाठी आवश्यक प्रमाणात बेड्स व इतर अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याची कमतरता जाणवत आहे.सोलापूर सिव्हील व इतर खासगी रुग्णालयात रुग्णांना दाखल होण्यासाठी बेड्सची उपलब्धतता तात्काळ होताना दिसत नाही.ग्रामीण भागातील आर्थिक स्तर पाहता मोठा खर्च देखील त्यांना झेपत नाही.सतत दुष्काळी परिस्थितीत लढा देऊनही आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांची सध्या मोठी अडचण होताना दिसत आहे.याचा विचार करून जिल्हाधिकारी यांनी या अडचणीची तात्काळ दखल घेऊन सिव्हिल व खासगी दवाखाने या दोन्ही बेड्सची संख्या वाढवून दिलासा द्यावा अशी मागणी कल्याणशेट्टी यांनी केली आहे.