ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अ‍ॅड.सर्जेराव जाधव यांचे कार्य समाजाला दिशादर्शक : मोरे ; जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये विविध कार्यक्रम

अक्कलकोट, दि.२५ : प्रसिद्ध सरकारी वकील अ‍ॅड. सर्जेराव जाधव हे अक्कलकोटचे भूषण आहेत. त्यांनी स्वतःची संपत्ती आणि पैसा हा समाजासाठी समर्पित केला अशी माणसे समाजामध्ये दुर्मिळ असून त्यांचे कार्य खरोखर दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी प्रदीप मोरे यांनी केले. अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या १०३ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमास सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.सुरेशराव गायकवाड, डॉ. संतोष मेहता, ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शरदराव फुटाणे, फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव माने, उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव, सर्जेराव जाधव यांचे पुतणे संतोष जाधव – फुटाणे, नातू परितोष जाधव, विश्वस्त मोहनराव चव्हाण, सुरेश फडतरे, फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब मोरे, तानाजी चव्हाण, सोपान गोंडाळ, अमर शिंदे, प्रभाकर मजगे, स्वामीराव पाटील, अमर पाटील, भीमराव साठे, अ‍ॅड. शशिकांत मचाले, अंबणप्पा भंगे, के.बी.पाटील आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त शिवाजीराव पाटील यांनी केले.

पुढे बोलताना मोरे म्हणाले, समाजाला अ‍ॅड.जाधव यांच्यासारख्या महामानवाची गरज आहे.पैसे कुणाकडे नाहीत सर्वांकडे आहेत परंतु आपल्या पश्चातही समाजाची सेवा निरंतरपणे सेवा चालू राहावी, ही अपेक्षा जिवंत असताना त्यांनी व्यक्त केली. अशी माणसे दुर्मिळ आहेत,अशा शब्दात त्यांनी जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले.

अ‍ॅड.गायकवाड म्हणाले, जाधव चॅरिटेबल ट्रस्ट हे तालुक्यातील गरिबांसाठी आशेचा किरण आहे.जाधव यांनी आपल्या हयातीच्या काळामध्ये प्रामाणिक पणे जेवढी संपत्ती कमवली ती सर्व समाजाला दिली. मानवतेचा खरा धर्म त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला, असे ते म्हणाले.

अ‍ॅड. फुटाणे म्हणाले, जाधव यांनी संस्थेची घटना ही पूर्णपणे गरीब आणि वंचितांसाठी करून ठेवली आहे.आम्ही फक्त ते पुढे नेत आहोत आणि हा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे सुरू ठेवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

माने म्हणाले, जाधव यांनी निष्पृहपणे समाजाची सेवा केली केवळ गरिबांना मदत व्हावी त्यांचे जीवनमान उंचावे यासाठी संस्थेची स्थापना करून त्याचे कार्य आज निरंतरपणे सुरू आहे. प्रारंभी श्री स्वामी समर्थ आणि जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अक्कलकोट तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी चेतन जाधव, चंद्रकांत हरळय्या, दाजीसाहेब लोंढे, विक्रांत गोडसे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. फुटाणे यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या वतीने अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त शंकरराव पवार यांनी केले. कार्यक्रमास लाभार्थी व अक्कलकोट मधील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

७५ हजारांच्या मदतीचे वाटप

तालुक्यात दरवर्षी जयंतीच्या निमित्ताने गोर गरीब वंचितांसाठी वैद्यकीय,शैक्षणिक तसेच आरोग्य विषय कामांसाठी मदत दिली जाते. यावर्षी ७५ हजार रुपये धनादेशद्वारे वाटप करण्यात आले.तसेच १०३ जणांना चादरी वाटप करण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!