होटगी रोड ‘जैसे थे’ ठेवून बोरामणी विमानतळाचा विकास करा ; अक्कलकोटच्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री शिंदे यांची भेट
अक्कलकोट ,दि.२८ : सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीला धक्का न लावता होटगी रोड विमानतळ ‘जैसे थे’ ठेवून एका बाजूने विमान सेवा सुरू करावी आणि बोरामणी विमानतळाचा विकास तातडीने करावा,अशी मागणी अक्कलकोटच्या शिष्टमंडळाने केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली व सोलापूरच्या विमानतळाबाबत निवेदन सादर केले. त्यावेळी वस्तुस्थिती त्यांना सांगण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यासाठी सध्या बोरामणी गावातील विमानतळाच्या काही अडचणी दूर होणे गरजेचे आहेत. याचे काम गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. या विमानतळाची सध्याची स्थिती आणि पुढील कामे याबाबत चर्चा झाली. तसेच हे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांना होणारा लाभ यावर चर्चा झाली. या योजनेस अंतिम स्वरूप देण्यात यावे,अशी आमची मागणी आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन उर्वरित प्रक्रिया जलद करावी, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे, असे पाटील यांनी सांगितले.
सध्या सोलापूरच्या नागरिकांना विमान प्रवास करण्यासाठी कलबुर्गी, पुणे, मुंबई व हैदराबाद या ठिकाणी जावे लागत आहे. शेजारच्या कलबुर्गीहून बंगळूर, तिरुपती बालाजी आदींसह अनेक ठिकाणी सेवा मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूरला विमान सेवेची गरज आहे. ही बाब त्यांना पटवून देण्यात आली.
यावर बोलताना शिंदे म्हणाले की, फॉरेस्ट विभागाच्या जमीनीबाबत राज्य शासनाने तसा प्रस्ताव द्यावा, त्यावर केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल, असे त्यांनी सांगितले. या शिष्टमंडळात खंडेराया वग्गे, बसवराज उण्णद, मधुकर सुरवसे, मल्लिनाथ करपे आदींचा समावेश होता.