दिल्ली : न्यूयॉर्कहून दिल्लीला येण्यासाठी एअर इंडियाच्या विमानात प्रवास करत असलेल्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. प्रवासात जेवण केल्यानंतर महिला तिच्या सीटवर येऊन बसली. परंतु मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका पुरुष प्रवासी महिलेजवळ आला आणि त्यानं महिलेच्या तोंडावर, अंगावर आणि तिच्या सामानांवर मूत्रविसर्जन केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळं आता या विकृत प्रवाशावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
टाटा ग्रुपचे चेयरमन चंद्रशेखरन यांना पीडित महिलेलनं लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, आरोपीनं अंगावर मूत्रविसर्जन केल्यामुळं कपडे ओले झाले होते. याशिवाय सोबतचं सामानही त्यामुळं भिजलं. मी या प्रकरणाची तक्रार एअर होस्टेस आणि क्रू मेंबर्सला केल्यानंतर ते डिसइन्फ्कटेंट फवारून निघून गेले. याशिवाय त्यांनी डिस्पोजेबल चप्पल आणि एक पँट वापरण्यासाठी दिली. परंतु आरोपीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असं पीडित महिलेनं टाटा ग्रुपच्या चेयरमनला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचं विमान न्यूयॉर्कहून दिल्लीच्या दिशेनं निघालं होतं. त्यावेळी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत असलेल्या एका महिलेवर दारुड्या प्रवाशानं मूत्रविसर्जन केलं. त्यावेळी महिलेनं घडलेला सारा प्रकार क्रू मेंबर्सना सांगितला. परंतु विमान प्रवासात आणि विमान दिल्लीत लँड झाल्यानंतरही आरोपी प्रवाशावर एअर इंडियावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्यानं पीडित महिलेनं टाटा ग्रुपचे चेयरमन चंद्रशेखरन यांना पत्र लिहून घडलेला प्रकार सांगत कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर आता त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळं आता आरोपीला तातडीनं अटक होण्याची शक्यता आहे.