सोलापूर- पत्रकार हे फ्रेंड्स, फीलॉसॉफर आहेत. ते समाजाचा आरसा बनून वास्तव मांडत असतात. प्रशासनाची आणि पत्रकाराची मैत्री ही असलीच पाहिजे. त्यातून विकासाची प्रक्रिया गतिमान होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पत्रकारितेतील नवे प्रवाह’ या विषयावर दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवेढेकर इन्स्टिट्युटच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस आयुक्त राजेंद्र माने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.मृणालिनी फडणवीस होत्या. मुद्रित माध्यमातील नवे प्रवाह या विषयावर ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील नवे प्रवाह या विषयावर मयुरेश कोन्नूर तर डिजिटल माध्यमातील नवे प्रवाह या विषयावर विश्वनाथ गरूड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, मयुरेश कोन्नूर, विश्वनाथ गरुड, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले, डॉ. बाळासाहेब मागाडे, डॉ. अंबादास भासके, ऋषीकेश मंडलिक यांनी केले.
प्रास्ताविकात सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे म्हणाले की, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यावतीने घेण्यात येत असलेली ही कार्यशाळा महत्त्वाची आहे. मास कम्युनिकेशन विभाग हा कौशल्य युक्त पत्रकार घडविण्यात अग्रेसर आहे.
यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेळबुडे यांनी बोलताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठाने कार्यशाळा घेतल्याबद्दल आभार मानले व श्रमिक पत्रकार संघामध्ये घेण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पुढे म्हणाले की, प्रशासनामध्ये काम करत असताना पत्रकारांचा संबंध येत असतो. प्रशासनाच्या बातम्या, राबविब्यात येणाऱ्या विविध योजना या सामान्य नागरिकांपर्यन्त पोहचविण्याचे काम हे पत्रकार करत असतात. समाजामध्ये घडत असलेले प्रतिबिंब हे वर्तमानपत्रामधून देण्यात येत असते. याचे कौतुक जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. पत्रकार हे फ्रेंड्स, फीलॉसॉफर आहेत. प्रशासनाची आणि पत्रकाराची मैत्री ही असली पाहिजे. ती अत्यंत महत्वपूर्ण असते असे मनोगत त्यांनी बोलताना व्यक्त केले.
पोलीस आयुक्त राजेंद्र माने म्हणाले की, खरतर ट्राफिक, गुन्हेगारी किंवा समाजामध्ये शांती व सुव्यवस्था कायम व सुव्यवस्था अबादीत ठेवण्यासाठी पत्रकारांचे खूप सहकार्य मिळत असते. पत्रकारांचे कार्य समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये पत्रकार घडवण्याचे काम करत आहोत. तरुण हा डिजिटल युगाशी जोडला गेलेला आहे. त्याला त्याबाबतची माहिती देण्याचे काम आता तर करत आहोत. येणाऱ्या काळातही हे काम जोमाने करू. कुठलेही क्षेत्र असुदे तिथे पत्रकारिता व लीगल टीम असणं हे गरजेचं आहे. पत्रकाराने एक तरी स्पेशलायझेशन केलं पाहिजे. आरोग्य, क्रीडा, अशे विविध प्रकारातील एक स्पेशलायझेशन असे आवाहन कुलगुरू मृणालनी फडणवीस यांनी बोलताना केले. पत्रकारांनी मिळत असलेल्या तयार बातम्या या कट, पेस्ट न करता त्यांनी स्वतः विविध, कार्यक्रमाची बातमी तयार केली पाहिजे असे त्यांनी बोलताना व्यक्त केले.
श्रमिक पत्रकार संघाबरोबर 2009 साली पहिली पत्रकारांसाठीची कार्यशाळा आयोजित केलेली होती. सोलापूर विद्यापीठ मध्ये शिकत असलेले विद्यार्थी हे दिल्ली व इतर भागात ते कार्य करत आहे. दि. 7 जानेवारी 2023 रोजी tv9 न्यूज चॅनलला सत्यजित वाघमोडे हे प्रोड्युसर म्हणून जॉईन झाले त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी ( मुंबई) हे मुद्रित माध्यमातील नव्या प्रवाहाबाबत मार्गदर्शन करताना म्हणाले की, पत्रकार हा समाजाच्या समस्या मांडतो. परंतु पत्रकारांच्या समस्या मांडण्याचे काम आम्ही करत आहोत. मुद्रित माध्यमे झपाट्याने बदलत आहेत. त्यामुळे या बदलासोबत पत्रकारांनीही बदलण्याची गरज आहे. नागपूर नंतर निवृत्ती नंतर जर कुठे राहायला आवडेल तर ते सोलापूर आहे. येथे तीन भाषांचे संगम असणार म्हणजे सोलापूर शहर आहे.
इलेक्ट्रॉनिक माध्यमातील नवे प्रवाह या विषयावर मयुरेश कोन्नूर यांनी मांडणी केली. तर म्हणाले की, डिजिटल मीडिया, सोशल मीडियामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमात नवे बदल होताना दिसत आहेत. आता घडलेली बातमी सोशल मीडियावर लगेच वाचकांना पाहायला मिळते. मुद्रित माध्यमा प्रमाणेच इलेक्ट्रॉनिक माध्यमावर लोकांचा मोठा विश्वास आहे. या माध्यमाची एक ठराविक पद्धतीची भाषा असते. चित्रफीत, आवाज, शब्द याचे वेगळ्यापद्धतीने सादरीकरण करून ही वेगळी भाषा विकसित होत राहते.
विश्वनाथ गरूड म्हणाले की, निश अर्थात एखाद्या विषयावर सातत्याने सखोल लेखन करणे महत्त्वाचे आहे. डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची संख्या आणि वेगळेपणा असावा. गुगल ॲडसेन्स कंपनी आपली धोरणे सतत बदलत आहे. त्याचाही अभ्यास करायला हवा. डिजिटल पत्रकारितेसमोर अनेक संकटे आहेत. नवे बदल स्वीकारायला हवेत. तंत्र साक्षर बनावे. टेक्नोलॉजी कंपन्यामध्ये कंटेंट क्रिएटरच्या नोकरीच्या खूप संधी आहेत.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यं. कुलकर्णी, अभय दिवाणजी, नारायण कारंजकर, प्रशांत माने, श्रीकांत कांबळे, दशरथ वडतिले, समाधान वाघमोडे आदी उपस्थित होते.