नाशिक पदवीधर निवडणुक ; डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या विरोधात नाना पटोले यांनी थोपटले दंड
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाला तोंडघशी पाडणारे डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या विरोधात नाना पटोले यांनी दंड थोपटले आहेत. तांबे पिता-पुत्रांविरोधात पटोले यांनी दिल्लीत तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. सत्यजीत तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पक्षानं अधिकृत उमेदवारी जाहीर करून व एबी फॉर्म देऊनही सुधीर तांबे यांनी काल अचानक निवडणुकीतून माघार घेतली व मुलाच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा दिला. यावर नाना पटोले यांनी आज नागपूरमध्ये मीडियाशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
नाना पटोले म्हणाले की, ‘आम्ही सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. नाशिकमध्ये जे काही घडलं, ते हायकमांडला कळवलं आहे. हायकमांडचा निर्णय आज अपेक्षित आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल. बंडखोर उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार नाही, असं ते म्हणाले. ‘पक्षानं सुधीर तांबे यांना तिकीट दिलं होतं. त्यांनी फॉर्म न भरता पक्षाची फसवणूक केली आहे. स्वत:च्या मुलाला अपक्ष उभे करून ते भाजपचा पाठिंबा घेणार आहेत. ही एक प्रकारची दगाबाजी आहे, असा संताप पटोले यांनी व्यक्त केला.
ज्या दिवशी त्यांचं घर फुटेल, तेव्हा त्यांना..!
‘भाजपने भीती दाखवून घरं फोडण्याची जी कामं सुरू केली आहे, त्याचा आता त्यांना आनंद होत असेल. पण ज्या दिवशी त्यांचं घर फुटेल, तेव्हा त्यांना खरं दु:ख समजेल, असा सूचक इशाराही पटोले यांनी दिला. ‘भाजप आणि तांबे यांचं आधीच ठरलं होतं हे आता स्पष्टच दिसत आहे. भाजपनं अर्ज न भरल्यानं ते उघडच झालंय. त्या भागातील पदवीधर मतदारही हे सगळं पाहत आहेत. ते अडाणी नाहीत, असं पटोले म्हणाले