सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर ; मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने केली जोरदार तयारी
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीच्या मैदानावर भाजप मोठा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्या निमित्त चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या निमित्त काही मार्गावरील वाहतूक ही बंद ठेवण्यात आली असून येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो काही कावालधीसाठी बंद असणार आहे. तर पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
एम एमआरडीए मैदान, बीकेसी मैदान, मेट्रो सात मार्गिका गुंदवली आणि मोगरापाड्याला मुंबई पोलिसांकडून उड्डाण प्रतिबंधक क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच पोलीस उपायुक्तांची सुरक्षेत हजेरी राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी २७ एसीपी, १७१ पोलीस निरिक्षकांसह तब्बल ३९७ पोलीस अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. याशिवाय अडीच हजार पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या, दंगल विरोधी पथकाची एक तुकडी आणि शीघ्र कृती दलाचे जवानही सुरक्षेत तैनात असणार आहे.