ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हे तीन पक्षाची अनैसर्गिक आघाडी सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ ; देवेंद्र फडणवीस

सोलापूर : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे. तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आगामी काळात मनसेला सोबत घेणार नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.

तसेच यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे.  अनैसर्गिक आघाडीने तयार झालेले राज्य सरकारचे नाकर्तेपण लपवण्यासाठी संजय राऊत यांना आता भाजपच्या विरोधात अग्रलेख लिहिण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.  विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षकमतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर श्रीकांचना यन्नम, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख ,आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होती.

यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अवकाळी पाऊसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत, निसर्ग चक्रीवादळ, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई, निसर्ग चक्रीवादळ आणि वाढीव वीजबिलांवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. वाढीव वीजबिलाच्या संदर्भात सरकारनं घुमजाव केले आहे. राज्य सरकारनं पलटी मारली आहे. त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. महावितरणसह तीन वीज कंपन्याच्या सरकारने केवळ पाच वर्षे चौकशी न करता वीस वर्षाची चौकशी करावी. कारण सर्वात कमी दराने वीज खरेदी आमचे सरकारच्या काळात झाली आहे. सर्वात चांगल्या पद्धतीने महावितरणची सेवा लोकांना आम्ही उपलब्ध करून दिली होती, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अतिवृष्टीमुळं सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नदी काठावरील ऊसासह सर्व पिकांचं मोठं नुकसान झालं. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या कोकणाला काही मिळालं नाही. फळबागांना कोणतिही मदत देताना दिसत नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!