मुंबई : ‘शिवसेनेशी गद्दारी करून सुरतला पळून गेलेल्या टोळी मुळेच राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत. दावोसमध्ये करार केल्याचे सांगत या खोके सरकारने राज्यात बोगस कंपन्या आणल्या आहेत. त्याचा लवकरच भंडाफोड करू,’ असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
हिंदु हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनेच्यावतीने रांजणगाव शेणपुंजी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आदित्य ठाकरे बोलत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंमत, ताकद, जिद्द, निष्ठा अशा शिवसेना प्रमुखांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचा नैतिक अधिकार घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
‘सध्या राज्य ओके नाही, पण सरकारमध्ये खोके खाऊन ओके होऊन बसलेले आहेत. कुणी 50 खोके घेतले, कुणी नऊ लायसन्स घेतली, तरीही त्यांचे पोट भरलेले नाही, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, अतिवृष्टीची मदत मिळालेली नाही, कृषिमंत्री शेतकऱ्यांना भेटायला तयार नाहीत, राज्यातील उद्योग गुजरातेत पळून गेले, बेरोजगारांना रोजगार नाही, महागाई वाढत चालली आहे. मात्र घटना बाह्य सरकारला त्याचे काहीच घेणेदेणे नाही. अशा सरकारविरोधात वज्रमूठ आवळण्यासाठी एकत्र यावे लागेल. असे ते पुढे म्हणाले.
याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.