मुंबई, दि. २३ : – हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. फोर्ट परिसरातील डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. त्याचदरम्यान माध्यमांशी बोलतांना त्यांचा कंठ दाटून आला. त्यासोबतच विधिमंडळाने बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचे ठरविले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज, सोमवार रोजी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी मला वेळोवेळी बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते. असे भावुक वक्तव्य केले. बाबासाहेब यांचे योगदान केवळ राज्यात नव्हे तर जगभरात आहेत. आज बाळासाहेबांमुळेच सर्वसामान्य कार्यकर्ते अनेक मोठ्या पदावर आहेत. माझ्यासारखे कार्यकर्ते देखील त्यांच्याच विचारांनी प्रभावित आहे. त्यांच्यामुळे व त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यांच्यामुळेच मला जनतेची सेवा करण्याचे भाग्य लाभले, असे म्हणत शिंदे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई आदी मान्यवरांनीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.