अक्कलकोट, दि.१ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला.यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे.
राष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणारा अर्थसंकल्प
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मूलभूत सुविधांवर मोठी तरतूद करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील राष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे.
हा अर्थसंकल्प वंचित वर्गाला प्राथमिकता देणार आहे.या अर्थसंकल्पामुळे आशा आकांक्षांनी भरलेला समाज, शेतकरी वर्ग आणि मध्यमवर्गाची स्वप्ने पूर्ण होतील.
यंदाच्या अर्थसंकल्पाने मध्यमवर्गाला मदत केली आहे. तसेच प्रत्येकाला काही ना काही यातून मिळाले आहे – सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाध्यक्ष भाजप
केवळ स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. वाढती महागाई रोखण्यासाठी कोणतीही भरीव पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीयांवर महागाईचा बोजा वाढतच राहणार असून हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार आहे. केवळ अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी काही नाही.ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे – सिद्धाराम म्हेत्रे,माजी मंत्री
कोरोंना नंतरच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प
आजचा अर्थसंकल्प हा प्रामुख्याने मध्यम वर्गीय करदात्याना दिलासा देणारा होता. नवीन करप्रणालीमध्ये उत्पन्न मर्यादा पाच लाखावरून सात लाख एवढे वाढविल्याने ज्याचे करपात्र उत्पन्न सात लाखाहून कमी आहे अशा करदात्याना काहीच आयकर भरावा लागणार नाही. तसेच या नविन करप्रणाली मध्ये कराच्या रचनेत फेरबदल केल्याने विशेषकरून मध्यमवर्गीय करदात्याना कमी आयकर भरावा लागणार आहे. कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यटन, हरित ऊर्जा, शिक्षण व कौशल्य अशा सर्व क्षेत्रात भरीव निधीची तरतूद केल्याने कोरोनापासून मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा हा अर्थसंकल्प दिसून आला – सी ए ओंकारेश्वर उटगे, अक्कलकोट