मुंबई : नाना पटोले यांच्या मनमानीवर नाराज असलेले व हायकमांडला पत्र लिहिणारे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. थोरात यांनी आपल्या वाढदिनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा हायकमांडकडे पाठविला आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात असल्याचीही माहिती मिळत आहे. पण बाळासाहेब थोरात मात्र आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे.
नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात हा वाद विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यावरुन बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देखिल दिली होती.
बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे जुने-जाणते व ज्येष्ठ नेते आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपची वाट धरल्यानंतरही अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नेमस्त स्वभावाच्या थोरात यांचे पक्षात मोठ्या संख्येनं समर्थक आहेत. गट नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते नेमकी काय भूमिका घेतात की पक्षश्रेष्ठी दिल्लीत बोलावून त्यांची समजूत काढतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.