दे.भ. स्वातंत्र्यसेनानी डॉ. अंत्रोळीकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर ; रवींद्र देशमुख, अरविंद मोटे, जहांगीर अ. रज्जाक शेख मानकरी पुरस्कार वितरण सोहळा रविवारी
सोलापूर , ता. ७ : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या, गरीबांचे डॉक्टर म्हणून परिचित असलेल्या व सच्चे गांधीवादी म्हणून नावलौकिक असलेल्या दे. भ. स्वातंत्र्यसेनानी डॉ. कृष्ण भीमराव अंत्रोळीकर स्मृती प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
यावर्षी दै. लोकमतचे मुख्य उपसंपादक (हॅलो सोलापूरचे मुख्य) रवींद्र देशमुख यांना हुतात्मा ‘गझनफर’ कार अब्दुल रसूल कुर्बान हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार, दै. सकाळचे वरिष्ठ वार्ताहर अरविंद मोटे यांना दे. भ. ‘कर्मयोगी’ कार रामभाऊ राजवाडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार, जहांगीर अ. रज्जाक शेख यांना स्वातंत्र्यसेनानी दे.भ.डॉ. कृ.भी. अंत्रोळीकर स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. ५००० रु. रोख, स्मृती चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हे पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री, आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते दिले जाणार असून या समारंभाचे अध्यक्षस्थान माजी महापौर अॅड. यु.एन. बेरीया हे भूषविणार आहेत. हा समारंभ ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुहास पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी दे.भ.डॉ.कृ.भी.अंत्रोळीकर यांच्या जीवनावरील ‘समर्पण’ या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
हा समारंभ रविवारी (ता. १२) सायंकाळी ६ हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये आयोजित केला जाणार असून नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर व सचिव मोहन अंत्रोळीकर यांनी केले आहे.