मारुती बावडे
अक्कलकोट : कुरनूर धरणात यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६० टक्के पाणी शिल्लक असल्याने तालुक्याचा उन्हाळा सुसह्य जाणार आहे. नदीकाठच्या गावांना तर दिलासा मिळेलच पण खास करून अक्कलकोट शहरातील पाणीटंचाई तीव्रतेने जाणवणार नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
दरवर्षी कुरनूर धरणातील पाण्याचे पाटबंधारे विभाग नियोजन करत असते. यावर्षी पहिल्या टप्प्यात जानेवारी महिन्यात २० ते २२ टक्के पाणी सोडण्यात आले. त्यानंतर आज घडीला ६० टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. दुसरे आवर्तन अजून बाकी आहे. कदाचित ते पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यानंतरही धरणात ४० टक्क्यापर्यंत पाणी शिल्लक राहू शकते. यानंतर दोन ते अडीच महिने हे पाणी सहज पुरू शकते. बाष्पीभवनाने चार ते पाच टक्के पाणी जरी कमी झाले तरी उन्हाळ्यात पाण्याची फारशी चणचण भासणार नाही, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
पावसाळा लांबला तर मात्र संकट ओढवू शकते. अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गीसह नदीकाठच्या अनेक गावांचा पाणीपुरवठा
या धरणावर अवलंबून आहे. पूर्वी अक्कलकोट शहर व तालुक्यात टँकरने पाणी लागायचे. आता मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हा प्रकारच बंद झाला आहे. पाझर तलाव, साठवण तलाव गावोगावी झाल्याने सिंचन क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे.
पूर्वीसारखे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी झाली आहे. पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन होत असल्याने टँकर मुक्त तालुका झाला आहे तसेच गावोगावी राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित झाल्याने शाश्वत स्वरूपाच्या योजनेतून नागरिकांना मुबलक स्वरूपात पाणी मिळत आहे. त्यातच पावसाळा मोठ्या प्रमाणात होत असल्याने कुरनूर धरण दरवर्षी शंभर टक्के भरत आहे. त्यामुळे तालुक्यावरचे आता पाण्याचे संकट दूर झाले आहे.
यावर्षी तालुका टँकर मुक्तच राहणार !
गेल्या चार ते पाच वर्षापासून अक्कलकोट तालुका हा टँकर मुक्त तालुका म्हणून पुढे येत आहे.यावर्षी देखील पाणी मुबलक स्वरूपात असल्याने हा तालुका टँकर मुक्तच राहील,असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.सध्या कुरनूर धरणात ५४५ दशलक्ष घनफूट म्हणजे ६० टक्के शिल्लक पाणी आहे.ते उन्हाळ्यात पुरणार आहे.