ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सिद्धेश्वर एक्सप्रेसमुळे होईल भाविकांची सोय ; वंदे भारत एक्सप्रेस गुरुवारीही सुरू ठेवण्याची मागणी

अक्कलकोट, दि.१४ : भाविकांची वाढती गर्दी तसेच वेळेचा अभाव पाहता भाविकांना लवकर दर्शन व्हावे यासाठी सिध्देश्वर एक्सप्रेस अक्कलकोट रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिकेतून पाहिल्यास भाविकांची मोठी सोय होणार आहे, असे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर दर गुरुवारी वंदे भारत एक्सप्रेसचे नियोजन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शिर्डी, पंढरपूर पाठोपाठ आता अक्कलकोट हे देखील मोठे तीर्थक्षेत्र बनले आहे. हजारो भाविकांची रोज ये-जा पाहायला मिळत आहे. हे पाहता दळणवळणाची सुविधा आणखी व्यापक प्रमाणात होणे गरजेचे आहे. यातच मुंबईहून अक्कलकोटला येणार्‍या भक्तांसाठी रेल्वे ही सोलापूरपर्यंतच असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्याने मुंबईहून सोलापूरला येण्यासाठी आधीपासून सुरु असलेली सिध्देश्वर एक्सप्रेस ही अक्कलकोटपर्यंत सोडावी. सिध्देश्वर एक्सप्रेसचा शेवटचा थांबा हा अक्कलकोट रेल्वे स्थानक येथे केल्यास स्वामीभक्त हे थेट श्रीक्षेत्र अक्कलकोटपर्यंत अवघ्या काही मिनिटात पोहोचू शकणार आहेत. रात्री परत निघणारी सिध्देश्वर ही देखील अक्कलकोट स्थानकावरुनच निघावी.
यामुळे भक्तांना मोठा दिलासा मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला सुरुवात झाली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते सोलापूर व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते साईनगर शिर्डी या मार्गावर एक्सप्रेस धावू लागली आहे.मात्र मुंबई – सोलापूर या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस दर गुरुवारी धावणार नसल्याने श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे येणार्‍या भक्तांना या रेल्वेचा फायदा होणार नाही. त्यामुळे गुरुवारी देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याची मागणी भोसले यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!