मारुती बावडे
अक्कलकोट : समाजात शेती नसणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे पण या लोकांना दरवर्षी हुरडा खाता यावा, यासाठी अक्कलकोट येथील दानशूर प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार यांनी हूरडा महोत्सव आयोजित करून मोठा दिलासा दिला आहे. गेली १५ वर्ष हा उपक्रम अखंडपणे सुरू ठेवून समाजाप्रती असलेली बांधिलकी व माणुसकी आजही कायम ठेवली आहे. या उपक्रमातून आत्तापर्यंत किमान एक ते दीड लाख लोकांनी हुरड्याचा आस्वाद घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
काही जणांकडे जिरायत, काही जणांकडे बागायत शेती असते परंतु प्रत्येकांकडेच हुरडा असतो किंवा आयोजित केला जातो असे नाही. काहीजणांना हुरड्यामध्ये खूप आवड असते आवर्जून ते दरवर्षी आपल्या आप्तेष्टांना खाऊ घालतात पण त्याला मर्यादा असते. प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार यांनी मात्र कशाचीही अपेक्षा न ठेवता अगदी निरपेक्षपणे शेती नसणाऱ्यांना खास करून हा हुरडा खाऊ घालतात. त्यांचा आदरतिथ्य आणि प्रेम हे सर्वांचे आकर्षण ठरले आहे. त्यामुळे दरवर्षी किमान पाच ते सहा हजार लोक हा हुरडा खातात.
यावर्षी देखील ३ फेब्रुवारी रोजी या महोत्सवाचे उद्घाटन झाले. आजपर्यंत हा महोत्सव सुरू आहे. सध्या देखील हा हुरडा महोत्सव सुरू असून रोज दोनशे ते तीनशे लोक याचा आस्वाद घेत आहेत. याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, दरवर्षी आम्ही पाच एकर जमीन खास हुरड्यासाठी ठेवतो आणि टप्प्याटप्प्याने हुरडा येतो तसे नियोजन आम्ही दरवर्षी केलेले
असते म्हणून आपल्याकडे क्वालिटी हुरडा मिळतो. बिराजदार म्हणाले, शेती असणारे लोक कुठेतरी हुरडा खाऊ शकतात पण शेती नसणारे लोक काय करू शकतात त्यांना विकत घेण्याशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही त्यांना बोलवून हुरडा खाऊ घालतो.
सध्या आमच्याकडे नरिबाल, गुळभेंडी, कुच कुची, श्रुती असे चार प्रकारचा हुरडा आहे. या महोत्सवामध्ये डॉक्टर, पत्रकार, वकील, राजकारणी, समाजकारण ,सामान्य नागरिक अशा सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी या महोत्सवाला भेट देऊन पाटील व बिराजदार यांच्या माणुसकीचे कौतुक केले आहे.
समाजाने आदर्श घ्यावा
समाज सध्या बदलत चालला आहे. प्रत्येक जण आपापला विचार करत आहे. अशा या स्वार्थी व आप मतलबी दुनियेमध्ये अशा प्रकारचा विचार करून निस्वार्थ भावनेने लोकांना हुरडा खाऊ घालणे हे बाब दुर्मिळ आहे. यांचा आदर्श समाजाने खरोखर घेण्यासारखा आहे – डॉ. नितीन तोष्णीवाल, सोलापूर