ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कांदा आणि कापूस दरांवरुन विरोधक आक्रमक ; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून कांद्यासंदर्भात आंदोलन सुरु आहे. कांदा आणि कापूस दरांवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. डोक्यावर कांदे घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून राष्ट्रवादी आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार घोषणाबाजी केली. डोक्यावर कांद्याचे टोपले घेऊन विरोधक विधानभवनात दाखल झाले आहेत. देशभरातील किरकोळ बाजारात कांदा प्रतिकिलो १५ ते २५ रुपये विकला जात आहे. मात्र, राज्यात कांद्याला २ ते ४ रुपये किलो भाव मिळत आहे. सरकार कांदा उत्पादकांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. कांद्याला भाव द्यावा, अशी घोषणाबाजी विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधक करत आहेत.

सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुरुवातीलाच विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!