दुधनी दि. २८ : येथील अक्कलकोट गाणगापूर महामार्गवरील मैंदर्गी नाक्यावर आज संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान कापसाने भरलेल्या एका ट्रकला आग लागल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाहन क्रमांक KA- 28 A- 7434 कर्नाटकातील तालुका जेवर्गीहून कापूस भरून सोलापूर येथे जात होती. सदर ट्रकला दुधनी येथील मैंदर्गी नाक्यावर रस्त्याच्या मधोमधून गेलेल्या महावितरणच्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने कापसाने भरलेल्या ट्रकला आग लागली. आग लागल्याची जाणीव होताच ट्रक चालक आणि वाहकाने ट्रकमधून खाली उडी मारली, यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही.
यावेळी बस स्थानकावर उपस्थित असलेल्या नागरिकांसह अनिल भाईकट्टी, तम्मण्णा कोटणुर, रेवणप्पा टक्कळकी, सय्यद शेख, गुरुषांत परमशेट्टी, सिद्धराम कन्नी, मल्लिनाथ आनुर या युवकांनी रूपा भवानी मंदिरातील बोअरवेल चालू करून पाणी मारून आगीवर नियंत्रण आणली. काही दिवसांपूर्वी एका उसाच्या ट्रकला देखील अशीच आग लागली होती. मैंदर्गी नाक्यावरील महावितरणच्या तारांना स्पर्श होऊन आग लागण्याची घटना वारंवार घडत असल्याने विद्युत खांबाची उंची वाढविवण्याची मागणी जोर धरत आहे.