मुंबई । देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाने डोख वर काढले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जाहीर करण्यात आले असून यात देशांतर्गत विमान, रेल्वे आणि रस्ते प्रवास करुन महाराष्ट्रात प्रवेशासाठी एसओपी जारी करण्यात आली आहे. आजपासून राज्यात या नियमांची अमंलबजावणी सुरु होणार आहे. त्यानुसार आजपासून राज्याच्या सीमांवर नाकेबंदी सुरु झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परराज्यातून राज्यात प्रवेश करणार्यावर राज्य सरकार कडून काही निर्बंध लावण्यात आले असून आज पासून कोरोना अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांनाच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. यात दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. 72 तासापूर्वीचा टेस्ट रिपोर्ट सादर करणे आवश्यक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील दापचरी चेकपोस्ट वर तयारी सुरू झाली आहे.
तर दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट मुंबईवर असताना बीएमसीन ती परतवून लावण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची स्क्रिनिंग सुरु करण्यात आली आहे. बस, रेल्वे आणि विमान प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करणं बंधनकारक आहे. बीएमसीने स्टेशनवर टेस्टिंग कॅम्प उभारले आहेत. बोरिवली स्टेशनवर जयपूर एक्सप्रेसमधून आलेला एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आला आहे.