अक्कलकोट, दि.१ : देशाच्या संरक्षणासाठी अनेक सैनिकांनी आतापर्यंत बलिदान दिले आहे परंतु आज त्याच माजी सैनिकांना त्यांच्या हक्काचे प्रश्न सोडवण्यासाठी साधे सैनिक कार्यालय अक्कलकोट तालुक्यात नाही त्यामुळे भारतीय माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली व माजी सैनिकांसाठी आपल्या स्तरावरून स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
गटविकास अधिकारी सचिन खुडे, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनाही निवेदन देण्यात आले. संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष विठ्ठल फडतरे, सचिव परशुराम कडची, खजिनदार बापूराव सुरवसे यांनी निवेदन सादर केले. माजी सैनिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अक्कलकोट शहर व तालुक्यात नुकतीच भारतीय माजी सैनिक संघटना स्थापन करण्यात आली आहे.
तालुक्यात २ हजार पेक्षा अधिक माजी सैनिक आहेत त्यांच्या कुटुंबाचे प्रश्न सोडविण्यासाठी एखाद्या ऑफिस व कॉन्फरन्स हॉलची तालुक्यात नितांत गरज आहे आणि ती जागा कायमस्वरूपी असावी. सध्या हे कार्यालय माजी सैनिकांच्या घरामधून सुरू आहे ही शोकांतिका आहे. आपल्या स्तरावरून याबाबत योग्य ती कार्यवाही केली जावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, असे तालुकाध्यक्ष भोसले यांनी सांगितले.
याबाबत शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी माजी सैनिकांनी केली आहे.