ऑनलाईन नोंदणी केलेल्या १५ हजार शेतकऱ्यांचे धान पडून ; व्यापाऱ्यांना स्वस्त किंमतीत धान विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
राज्यातील सर्व धान खरेदी केंद्र पुन्हा सुरु करा; विरोधी पक्षनेते अजित पवार आग्रही यांची मागणी
मुंबई, दि. ३ मार्च – ऑनलाईन नोंदणी केलेल्या राज्यातील ३० हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे १५ हजार शेतकऱ्यांचे धान्य पडून असताना सरकारने कोणतीही कल्पना न देता राज्यातील धान खरेदी केंद्र बंद केली. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत, तरी सरकारने तातडीने राज्यातील सर्व धान खरेदी केंद्र सुरू करावी अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या राज्यातील ३० हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे १५ हजार शेतकऱ्यांचे धान्य पडून असताना शासनाने दि.३१ जानेवारी २०२३ पासून पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील भात खरेदी केंद्रशासनाने शेतकऱ्यांना कल्पना न देता अचानक बंद केली आहेत. भात खरेदी केंद्र अचानक बंद केल्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र असंतोष पसरलेले असून शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले.
पालघर प्रमाणेच कोकण, विदर्भ व राज्यातील इतर भागात भात खरेदी केंद्रे अचानक बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने स्वस्त किंमतीत व्यापाऱ्यांना भात विकण्याची परिस्थिती ओढवलेली आहे. पालघर जिल्हयातील जव्हार विभागीय कार्यालय अंतर्गत १५ हजार शेतकऱ्यांची धान खरेदी अद्यापही प्रलंबित आहे. रायगड जिल्हयातील माणगांव सेंटरची ४०० शेतकऱ्यांची ७ हजार क्विंटल भात खरेदी प्रलंबित आहे. माणगांव केंद्रावर अजून १० हजार क्विंटल खरेदी होऊ शकते. अशीच परिस्थिती विदर्भांतील भात खरेदी केंद्रावर आहे. तरी शासनाने बंद केलेली खरेदी केंद्रे पुन्हा सुरु करावीत अशी मागणीही अजित पवार यांनी केली.