फॅमिली प्लॅनिंगचे कै. आवाबाई वाडिया कर्तृत्वशालिनी स्मृती पुरस्कार जाहीर ; फिरदोस पटेल, अश्विनी तडवळकर, कविता चव्हाण, अनीता माळगे, रंजना अक्षंतल- महिमकर पुरस्काराचे मानकरी
सोलापूर : फॅमिली प्लॅनिंगच्या राष्ट्रीय संस्थापिका पद्मविभूषण कै. आवाबाई वाडीया कर्तृत्वशालिनी स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी सोलापूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका फिरदोस पटेल, दै. दिव्य मराठीच्या वरिष्ठ पत्रकार अश्विनी तडवळकर, सामाजिक कार्यकर्त्या व टायगर ग्रुप सोलापूरच्या अध्यक्षा कविता चव्हाण, यशस्वीनी ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या संस्थापिका अनिता माळगे व साथी संस्थेच्या कार्यक्रम अधिकारी रंजना अक्षंतल- महिमकर यांना जागतिक महिला दिनानिमित्त फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय संस्थापिका पद्मविभूषण कै. आवाबाई वाडीया कर्तृत्वशालिनी स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा मंगळवार दि. 07 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया. सोलापूर शाखेचे मुख्य कार्यालय, परमेश्वर कोळी समाज मंदीर, दयानंद कॉलेज रोड, भवानी पेठ येथे आयोजित केला आहे. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार असून स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र, शाल व बुके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान वालचंद समाजकार्य विभागाच्या प्रा. डॉ. विजया महाजन या भूषविणार आहेत अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे समन्वयक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी दिली.
या पुरस्कार वितरण समारंभास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य के. एम. जमादार, सचिव प्रा. डॉ. आयेशा रंगरेज, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड व कार्यकारीणी सदस्यांनी केले आहे.