ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सुरत – चेन्नई या महामार्गाच्या आंदोलनाला रिपाईचा पाठिंबा ; मोबदला वाढीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

अक्कलकोट,दि.३ : सुरत – चेन्नई महामार्गाकरीता बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्ग किंवा पुर्वीप्रमाणे चारपट मोबदला मिळावे, यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी शुक्रवारी मंञालय येथे जाऊन निवेदन सादर केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला सदर निवेदन प्रत्यक्ष जाऊन दिले आहे. सोमवारी होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनात आपण प्रत्यक्ष सहभागी होणार असून हा अन्याय कदापि आम्ही सहन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला रिपाईचा पाठिंबा जाहीर केला आहे.

अक्कलकोट ग्रामीण, मैंदर्गी, नागनहळ्ळी, मातनहळ्ळी, सिन्नर, हसापूर, चप्पळगाव, चप्पळगाववाडी, बोरेगाव, दहिटणे, दहिटणेवाडी, डोंबरजवळगे आदी गावातील शेतजमिनी ग्रिनफील्ड एक्स्प्रेस हायवे मध्ये येणाऱ्या शेतजमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहेत. त्यांना प्रती एकरी जिरायत जमीनीला ५ लाख व बागायती जमीनीला ७ लाख ही अत्यंत कमी रक्कम मंजूर झालेली आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात प्रती गुंटा ५ लाख रुपये जिरायत जमीनीला तर ७ लाख रुपये बागायती जमीनीला मोबदला मिळणे आवश्यक आहे.

सदर मंजूर मोबदल्यामुळे यापुर्वी अन्य मार्गाला मोबदला मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये व सध्या मोबदला मंजूर केलेल्या शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव दिसून येत आहे. तरी सुरत – चेन्नई महामार्गाकरीता अधीग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनीच्या मालकांना मोबदला वाढवून न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तेंव्हा होणाऱ्या परिणामास सर्व संबंधित अधिकारी व शासन जबाबदार राहतील, असा इशारा रिपाइंचे तालुकाध्यक्ष मडिखांबे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!