सांगली : सांगलीत रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारण्यात येत असल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करायचे असेल तर जातीची अट घालण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे.
रासायनिक खतांसाठी शासन कंपनीला अनुदान देते. अनुदान देण्यासाठी तीन-चार वर्षांपासून ई-पॉस मशिन यंत्रणा आहे. रसायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना त्यांचा आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पोत्यांची संख्या सांगितल्यानंतर पॉस मशिनवर अंगठा देऊन खत मिळायचे. मात्र, सांगलीत गेल्या तीन-चार दिवसांपासून रसायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना थेट त्यांची जात विचारली जात आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. रसायनिक खत खरेदी करताना जात विचारली जात असल्यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये वाद सुरु झाले आहेत.
शेतकऱ्यांना खत देण्यासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. याचा करावा तितका निषेध कमीच आहे. सरकारची भूमिका ही जातीभेदास खतपाणी घालणारी आहे. सरकारने असे प्रकार ताबडतोब बंद केले पाहिजे.#BudgetSession2023 pic.twitter.com/gxNgp0SCae
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 10, 2023
यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, शेतकऱ्याला त्याची जात विचारून मग खत देणे हे अतिशय धक्कादायक आहे. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात आणि कदाचित देशातही असेल. त्यामुळे समाजातील जातीभेद आणखी वाढेल. असे जयंत पाटील म्हणाले आहेत.