अक्कलकोट,दि.१० : यावर्षी अतिरिक्त पावसामुळे ऊस उत्पादक संकटात असताना धोत्रीच्या गोकुळ शुगरने यंदाच्या हंगामातील शेतकऱ्यांची सर्व बीले त्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती चेअरमन
दत्ता शिंदे यांनी दिली.
यावर्षीचा गळीत हंगाम संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.यावर्षी एकरी उसाचे उत्पादन घटल्यामुळे शेतकरी चिंतेत होते.यातून आम्ही जे उद्दिष्ट ठेवले होते ते देखील साध्य झाले नाही.याला यावर्षीची परिस्थितीच कारणीभूत आहे तरीही यामध्ये शेतकऱ्यांना कोणती अडचण येऊ नये म्हणून आधी सर्व शेतकऱ्यांची बिले अदा करण्याचा निर्णय घेतला होता म्हणून आज अखेर सर्व बिले हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत. यावर्षीचा गाळप हंगाम २५ ऑक्टोबर रोजी सुरू झाला आणि तो १६ फेब्रुवारीला संपला.यात ५ लाख १ हजार ५४० मेट्रिक टन गाळप केले. त्यातून साखर उतारा १०.०१ मिळाला.यंदा उसाचे उत्पादन घटले असले तरी सरासरी प्रतिदिन ५ हजार २०० मेट्रिक टन गाळप सुरू होते.शेतकऱ्यांना प्रतिटन २ हजार २५० रूपयांचा पहिला
हप्ता जमा करण्यात आला आहे.भविष्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून या हंगामाची सर्व ऊसबिले अदा करणारा गोकुळ शुगर हा पहिला कारखाना ठरला आहे,असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.यावेळी व्हाईस चेअरमन विशाल शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रदीप पवार यांच्यासह शेतकी विभाग,कारखान्याचे इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना
मिळाला दिलासा
अतिवृष्टी झाल्याने यावर्षी ऊसाचे उत्पादन
खूप घटले.यात सर्व शेतकरी तर अडचणीत आले पण कारखान्याचे गणित चुकले
तरीही गोकुळ शुगरने वेळेत ऊस बिले देऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.त्यांनी ऊस बिले वेळेवर देऊन सहकार्य केले आहे.
नुरुद्दीन मत्तेखाने,किणी शेतकरी