मुंबई, दि. १६ मार्च कुर्ला भागातील भारत कोल कंपाऊंड, काळे मार्ग, कमानी येथे १९६० पासून १०० पेक्षा जास्त लघु उद्योग करणारे गाळे असून कंपाऊंडच्या आसपासच्या परिसरात राहणारे अंदाजे ४५०० पेक्षा जास्त कामगार काम करत असून यावर २० हजार लोकांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु ही मोक्याची जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी बीएमसीच्या एल विभागातील अधिकारी व स्थानिक पोलीस या उद्योजकांना धमकावत आहेत. राज्य सरकारने या कामगार आणि उद्योजकांना वाचवावे आणि बीएमसीच्या एल. विभागातील भ्रष्ट अधिकारी, पोलीस आणि बिल्डरवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत केली.
सरकार जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अनेक योजनांची घोषणा करत असते परंतु दुर्दैवाने सरकारचेच काही लोक आणि सरकारशी संबंधित बिल्डर पृथ्वी चौहान, मनपा एल. विभागातील सहायक आयुक्त महादेव शिंदे आणि सहायक अभियंता किनी आणि मनपा आयुक्त कार्यालयाशी संबंधित काही वरिष्ठ अधिकारी,स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे उद्योग बंद करून जागा बिल्डरला देण्याचा डाव आखला आहे.
गेल्या आठवड्यांमध्ये ४ ते ५ हजार कामगांरानी माजी मंत्री, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढून ‘उद्योग बचाव-कामगार बचाव’ अशी सभा घेतली. मनपा एल. विभागातील सहायक आयुक्त महादेव शिंदे आणि सहायक अभियंता किनी तसेच इतर संबंधित अधिकारी दबाव टाकून, धमकावून बिल्डरशी करार करा नाहीतर तुमच्यावर कठोर कार्यवाही होईल अशी धमकी देत आहेत.
शिंदे सरकारने अशा छोट्या-मोठ्या उद्योजकांना व हजारो कामगारांना त्वरित संरक्षण दिले पाहिजे आणि मनपा एल. विभागातील भ्रष्ट अधिकारी तसेच साकीनाका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.