वटवृक्ष मंदिरात समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा ; स्वामी समर्थांच्या नामघोषाने आसमंत दुमदुमले, हजारो स्वामीभक्त स्वामी चरणी नतमस्तक
अक्कलकोट, दि. २३ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रकटदिन मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. यानिमित्त हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. आज दिवसभर प्रचंड ऊन असूनही भाविकांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या साधारण एक किलोमीटर लांब भाविकांची रांग होती. त्यामुळे समर्थनगरी भक्तीने फुलून गेली होती.
पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्तिथीत करण्यात आली. त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होणे करिता सर्व स्वामी भक्तांना दुतर्फा रांगेतून दर्शनास सोडण्यात आले. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे चेअरमन इंगळे व प्रथमेश इंगळेंच्या प्रमुख उपस्थितीत भजन, नामस्मरण सोहळा, त्यानंतर हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्रींच्या पाळण्यातील मुर्तीवर गुलाल पुष्प वाहून पाळणा गीतांनी श्रीं चा पाळणा कार्यक्रम संपन्न झाला.
श्रींची आरती संपन्न होवून भजनगीत, पाळणा व आरतीने स्वामींचा जन्मोत्सव मोठ्या भक्ती भावात संपन्न झाला. यावेळी देवस्थानच्यावतीने नैवेद्य आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले. मंदीरात भाविकांच्या वतीने होणाऱ्या संकल्पित अन्नदानाच्या माध्यमातून दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्ष येथे महाप्रसाद घेऊन हजारो स्वामी भक्त तृप्त झाले.
भाविकांनी स्वामी दर्शन व भोजन महाप्रसादाची तृप्ती अनुभवल्यानंतर दुपारी स्वामी प्रकट दिनानिमित्त देवस्थाने रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. देवस्थानच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून १२८ रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णसेवेतून समाज सेवेत सहभाग नोंदविला. आज गुरुवार व स्वामींचा प्रकट दिन असा दुग्ध शर्करा योग साधून आल्याने दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले. रात्रीची शेजारती व दर गुरुवारी होणारा मंदिरातील पालखी सोहळा झाला नाही.दरम्यान श्री स्वामी समर्थांच्या
१४५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सालाबादाप्रमाणे पार पडणाऱ्या नगरप्रदक्षिणा-प्रभात फेरीस आज स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी पहाटे काकड आरती पूर्वी सुरुवात झाली. माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले राजेसाहेब व कुटूंबीय, धर्मादाय आयुक्त मुख्य कार्यालय मुंबईचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त मनीषा पाटील, तहसीलदार बाळासाहेब सिरसट, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, औरंगाबादचे उद्योजक राजसिंह दर्डा, पनवेलचे उद्योजक कपिल पाटील, अहमदनगरचे वैद्य जीवन कटारिया, पुण्याचे उद्योगपती प्रथमेश देशमुख आदी मान्यवरांसह हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
भाविकांना सुरळीत दर्शन होण्यासाठी पोलीस प्रशासनासह, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, स्वामलिंग कांबळे, बंडेराव घाटगे, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख,रामचंद्र समाणे, शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले आदींनी प्रयत्न केले.
भाविकांच्या गर्दीने रस्ते गजबजले
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या दक्षिण महाद्वारालगत असलेल्या मोकळ्या परिसरात भव्य कापडी मंडप उभारण्यात आले होते. ठिकठिकाणी पाणपोईची सोय करण्यात आली होती. त्यामुळे प्रचंड गर्दीमध्ये सुद्धा भाविकांना मंडपामुळे उन्हाचा त्रास जाणवला नाही. प्रचंड गर्दीने शहरातील रस्ते गजबजून गेले होते.