बाजार समितीच्या निवडणुकीत म्हेत्रे विरुद्ध कल्याणशेट्टी संघर्ष दिसणार ; माजी आमदार पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
अक्कलकोट, दि.२३ : सध्या तालुक्यात दुधनी आणि अक्कलकोट बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्याने सर्व कार्यकर्ते व नेते मंडळींचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. यात वर्चस्व कोणाचे राहणार याबद्दल चर्चांना ऊत आला आहे. या निवडणुकीत आता काँग्रेस विरुद्ध भाजप अशी काट्याची टक्कर रंगणार आहे.
दुधनीचा गड अबाधित ठेवण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे प्रयत्नशील आहेत तर आमदार सचिन कल्याणशेट्टी हे बाजार समितीच्या राजकारणात आपला गट मजबूत करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये सुप्त संघर्ष आतापासूनच पहायला मिळत आहे. येत्या २७ मार्चपासून या दोन्ही बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे.
दरम्यान स्वामी समर्थ कारखाना निवडणुक लागली आहे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार पाटील हे प्रयत्न करताना दिसत आहेत यात आमदार कल्याणशेट्टी यांची त्यांना साथ आहे. बिनविरोध होत असताना ज्या काही घडामोडी घडतील त्यावर काही प्रमाणात बाजार समितीचे समीकरणे अवलंबून आहेत. पाटील हे देखील हळू हळू आता तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मुलांना ते पुढे आणत आहेत. त्यामुळे या दोन निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका काय राहणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागच्यावेळी अक्कलकोट बाजार समितीचे निवडणूक तिन्ही गटाच्या विचारातून बिनविरोध झाली होती.
दुधनी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार होती परंतु ऐनवेळी निवडणूक लावली गेली. या निवडणुकीत म्हेत्रे यांनी आपला करिष्मा दाखवला होता आणि वर्चस्व मिळवले होते. पूर्वी या निवडणुकांमध्ये माजी आमदार पाटील व माजी मंत्री म्हेत्रे यांच्यामध्ये मोठा संघर्ष होता. प्रत्येक निवडणुकीत हा संघर्ष लक्षवेधी ठरायचा. त्याची चर्चा जिल्ह्यात आणि राज्यात व्हायची. या संघर्षाच्या लढाईत कधी म्हेत्रे तर कधी पाटील हे बाजी मारले होते. आज परिस्थिती वेगळी आहे.
आता या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये म्हेत्रे आणि कल्याणशेट्टी यांच्यामध्ये चर्चा होऊन निवडणुका बिनविरोध होणार की निवडणूका लागणार हे लवकरच कळेल. दरम्यान काँग्रेस आणि भाजपमध्ये काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या निवडणुकीत प्रत्येकाला आपल्याला संधी मिळावी असे वाटत आहे यावरून संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.