म्हैसलगेत श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती यात्रा महोत्सवाला प्रारंभ; ६ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन
अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगे येथील ग्रामदैवत श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती देवस्थानच्या वतीने यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त विविध कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. दि.६ एप्रिल पर्यंत हे सर्व कार्यक्रम चालणार असून यादरम्यान यात्रा पंच कमिटीच्यावतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष शिवराया बिराजदार व सचिव दशरथ न्हावी यांनी दिली.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या यात्रेला दरवर्षी सुरुवात होत असते.पाडव्यादिवशी पंचांग पठण व पालखी महोत्सवाला प्रारंभ झाला. यानंतर २९ मार्च रोजी शांताबाई हडलगेरी आणि पुंडलिक पुजारी (अफजलपुर )यांच्या धनगरी ओव्याचा कार्यक्रम होईल. ३० मार्च रोजी दुपारी १२ वाजता श्री राम जन्मोत्सव, हनुमान पालखी मिरवणूक पार पडणार आहे. ३१ मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले असून या शिबिरात विविध तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत.
१ एप्रिल रोजी कामदा एकादशी निमित्त सायंकाळी ५ वाजता दहीहंडी कार्यक्रम त्यानंतर हनुमान पालखी मिरवणूक व जलपूजन हे तीन कार्यक्रम पार पडणार आहेत. २ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जंगी कुस्ती तसेच रात्री १० वाजता कन्नड सामाजिक नाटकाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन राजशेखर जमादार व गोविंद बिराजदार यांच्या हस्ते पार पडेल.
६ एप्रिल रोजी भव्य हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम होणार असून यानिमित्त म्हैसलगे व परिसरातील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा पंच कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
यात्रा यशस्वी करण्यासाठी श्रीशैल भतगुणकी, गुरुसिद्धप्पा जोकारे, सिद्धाराम पुजारी, राहुल कुलकर्णी, गौडप्पा पाटील, बाबू पाटील,इरणा सुतार आदि प्रयत्नशील आहेत.