मारुती बावडे
अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुरनूर धरणातून उद्या (शनिवारी) संध्याकाळी ६ वाजता दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे नदीकाठच्या गावांना तसेच शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यातून केली जात होती.ही बाब लक्षात घेता पाटबंधारे विभागाने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा यांनी काल दिली.
कुरनूर धरणामध्ये सध्या ४० टक्के पाणीसाठा आहे कुरनूर धरणाखाली आठ कोल्हापुरी बंधारे येतात हे सर्व बंधारे किमान अडीच मीटरने भरून घेतले जाणार आहेत.
यापूर्वी एक वेळा कुरनूर धरणातून पाणी सोडण्यात आले होते.यंदाचे हे दुसरे आवर्तन आहे.गेल्या वर्षी कुरनूर धरण लाभक्षेत्रामध्ये आणि धरणाच्या वरच्या बाजूस मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरण ओव्हर फ्लो झाले होते.त्यामुळे अजूनही धरणामध्ये पाणी शिल्लक आहे परंतु पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे बॅक वॉटर क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सध्या मार्च महिना सुरू आहे एप्रिल मे आणि जून हे तीन महिने अजून बाकी आहेत पावसाळा जरी जून महिन्यात सुरू होत असला तरी कुरनूर धरण हे दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये भरत असते आणि कुरनूर धरणामध्ये जे येणारे
पाणी आहे ते तुळजापूर तालुक्यातील आहे.
त्यामुळे जोपर्यंत नळदुर्ग आणि तुळजापूर भागात मोठा पाऊस होत नाही तोपर्यंत धरणामध्ये पाणी येत नाही म्हणून पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.केवळ ४० टक्के पाणीसाठा असल्याने धरणा खालचे आठ कोल्हापुरी बंधारे अडीच मीटर पर्यंत भरू शकतील का याबाबत शंका उपस्थित होत आहे या बंधाऱ्यांना काही प्रमाणात गळती आहे तसेच आता नदीपात्र कोरडे असल्याने शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी जातेवेळी बरेच पाणी जमिनीत मूरणार आहे त्यामुळे पाणी सोडते वेळी प्रशासनाने समतोल साधावा,अशी मागणी पुढे येत आहे.