अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगांव येथे मल्लिकार्जुन देवस्थानच्या यात्रेस चैत्र शुद्ध एकादशी शनिवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. ही यात्रा उद्या सोमवार तीन एप्रिल पर्यंत चालणार आहे .यानिमित विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेत भाविकांची गर्दी आणि श्रद्धेचा अमाप उत्साह पाहायला मिळत आहे.
प्रतिवर्षी संवत्सरारंभ झाल्यानंतर सूर्याचे उत्तरायण चालू असताना सूर्यप्रकाश मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर पडतो. याचेच औचित्य साधून परंपरेने चैत्र शुद्ध एकादशी द्वादशी व त्रयोदशीला यात्रा साजरा करण्यात येते. यात्रेची सुरुवात शनिवारी एक एप्रिलला यण्णीमज्जनाने झाली.
या दिवशी रुद्राभिषेक , तैलाभिषेक व दुपारी कलगीतुरा कार्यक्रम, सायंकाळी श्रींच्या काठ्यांची मिरवणूक पार पडली.रात्री सरपंच उमेश पाटील मित्रमंडळाकडून ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. रविवार आज २ एप्रिल रोजी पहाटे श्रींची महापूजा, रुद्राभिषेक व सकाळी कलगीतुरा कार्यक्रम झाला. सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत काठ्यांची भव्य मिरवणूक निघाली.
या यात्रेत सरपंच उमेश पाटील युवा नेते बसवराज बाणेगाव, सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवठे, तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश पाटील,युवा नेते मनोज इंगुले आदींच यात्रा पंच कमिटीचे सदस्य, पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यानंतर शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होणार आहे.
रात्री महालक्ष्मी तरूण मंडळ व बसवेश्वर तरूण मंडळ यांचेकडून रत्नमांगल्य कन्नड सुंदर सामाजिक नाटक संपन्न होणार आहे. सोमवार दि . ३ एप्रिल रोजी पहाटे श्रींची महापूजा, रुद्राभिषेक, सकाळी कलगीतुरा कार्यक्रम तर चार वाजता जंगी कुस्त्यांच्या फडाचे आयोजन केले आहे. कुस्त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. रात्रौ दहा वा. श्री मल्लिकार्जुन तरूण मंडळ व भूमीपुत्र संघटनेच्यावतीने सौभाग्य लाभो मला हे सुंदर मराठी नाटक संपन्न होणार आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा पंचकमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.