ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंगळवारी स्वामी समर्थांचा १४५ वा पुण्यतिथी सोहळा परंपरेप्रमाणे महाप्रसाद, पालखी सोहळयाचे आयोजन

 

अक्कलकोट, दि.१६ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्री स्वामींचा १४५ वा पुण्यतिथी सोहळा मोठया उत्साहाने भक्तीभावाने साजरा होणार आहे. या निमित्त हजारो भक्तांची मांदियाळी जमणार आहे. ७ एप्रिलपासून मंदिरात नित्यअनुष्ठान, धर्मसंकीर्तन, पारायण, भजन, अखंड नामवीणा सप्ताह आदी धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.मंगळवार दि.१८ एप्रिल रोजी पुण्यतिथी महोत्सवाचा मुख्य दिवस आहे.यानिमित्त पहाटे २ वाजता श्रींची काकड आरती होईल.त्यानंतर श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण होईल. पहाटे ३ ते ५ या वेळेत नगर प्रदक्षिणा पार पडेल. देवस्थान व अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रींना पारंपारिक लघुरुद्र पहाटे ४ ते ६ या वेळेत करण्यात येईल. सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या भजनाने अखंड नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा सकाळी ६ वाजता देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात होईल. स्वामी भक्तांच्यावतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक भाविकांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता बंद ठेवण्यात येतील. जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना प्रसाद मिळेल.सकाळी ११ वाजता पुरोहित व मंदीर
समितीची महानैवेद्य आरती,११:३० वाजता अक्कलकोट राजघराण्याच्यावतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते व चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत मंदिराच्या पुर्वेकडील उपहारगृहात सर्व स्वामी भक्तांना पारंपारिक भोजन महाप्रसाद आयोजित केले आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत कोल्हापूर येथील महाद्वार स्वामी सेवा भजनी मंडळ यांची भजनसेवा देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात संपन्न होईल. सायंकाळी ५:३० ते रात्री १० या वेळेत श्रींचा सजविलेला सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा वटवृक्ष मंदिरातून निघेल. १९ एप्रिल रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत मंदिरात गोपाळकाला होवून या महोत्सवाची सांगता होणार आहे.

पुण्यतिथी महोत्सवाची
जय्यत तयारी

या पुण्यतिथीच्या दरम्यान हजारो भाविक हे अक्कलकोटला येत असतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी अक्कलकोट नगरपालिका प्रशासन व मंदिर समिती तसेच अन्नछत्र मंडळ यांच्याकडून जय्यत तयारी सुरू आहे.विविध सेवाभावी सामाजिक संघटना देखील भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!