परीक्षेच्या निकालाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार! नूतन प्रभारी कुलगुरू डॉ. कामत ‘वॉर’मधून घेताहेत आढावा
सोलापूर, दि.10- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या निकालाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही नूतन प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी दिली.
डॉ. कामत यांनी गेल्या शुक्रवारी पदभार घेतल्यानंतर सोमवारपासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली आहे. सुरुवातीलाच त्यांनी परीक्षा विभागाचा आढावा घेताना अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर न झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबद्दल त्यांनी परीक्षा विभागाची व निकालाची संपूर्ण माहिती घेऊन स्वतः दररोज सायंकाळी ‘वॉर’रूम मध्ये बसून निकाल लावण्यासंदर्भात नियोजन करून अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांना निर्देश दिले आहेत. तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन त्या संदर्भात त्यांनी उपाय सुचविले आहेत. त्यानुसार परीक्षा विभागाची टीम कामाला लागली आहे. सोबतच विविध विद्याशाखांच्या अधिष्ठातांची देखील नियुक्ती झाल्याने त्यांनाही सोबत घेऊन परीक्षा विभागाला मदत करण्याचे निर्देश प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्याकडून देण्यात आले आहेत.
60 टक्के अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल लागले आहेत, तर 40 टक्के परीक्षांचे निकाल जाहीर होणार आहेत. ‘ऑनस्क्रीन’ तपासणीच्या पद्धतीमुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. या तांत्रिक अडचणींवर नूतन प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी उपाय सुचवून यंत्रणा कामाला लावल्याने लवकरच सर्व परीक्षांचे शंभर टक्के निकाल जाहीर होतील. त्याबरोबरच पुढील परीक्षांचे नियोजन देखील करून लवकर सेमिस्टर संपवण्याचे निर्देश देखील त्यांनी परीक्षा विभागाला दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरु करण्यात येईल, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.