ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सद्गगुरु बेलानाथ बाबांचा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न;विविध कार्यक्रमांनी वेधले लक्ष

 

अक्कलकोट ,दि.२३ : येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेने बांधलेल्या व परम पूज्य सद्गुरु बेलानाथ बाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या राजेराय मठात बेलानाथ बाबांचा विसावा पुण्यतिथी उत्सव अखंड नामविना सप्ताह, धर्म संकीर्तन व कलात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. यानिमित्त दि.१४ मे ते २१ मे दरम्यान दररोज दिवसभर श्री साई सच्चरित ग्रंथाचे पारायण, भजन, प्रवचन, कीर्तन व हरिपाठ असे कार्यक्रम झाले. बेला फौंडेशनच्या सहकार्याने शालेय, महाविद्यालयीन व कलाकार व्यक्तींसाठी चार गटात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात सत्तरहून अधिक रंगकर्मींनी भाग घेतला विजेत्यांना स्वर्गीय विश्वासराव गायकवाड यांचे स्मरणार्थ स्मृतिचिन्ह व सर्व सहभागी धारकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कवी देवेंद्र औटी यांच्या उपस्थितीत नवोदित कवींचा काव्यवाचनाचा काव्यांजली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अक्कलकोट शहराबरोबर बाहेरगावच्या कवींचा देखील लक्षणीय सहभाग होता. या नवोदित कवींनी सामाजिक, धार्मिक,कौटुंबिक इत्यादी पार्श्वभूमीवरच्या कविता सादर करून श्रोत्याकडून वाहवा मिळवली.पुणे येथील मुकुंद बाद्रायणी प्रस्तुत स्वरसमर्थ अभंगवाणी हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गीतांचा व संतरचित अभंग गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.मुख्य पुण्यतिथी उत्सवा दिवशी पहाटे मठाचे उपाध्यक्ष विकास दोडके यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली.त्यानंतर सकाळी १० वाजता उपस्थित सर्व भक्तांच्या हस्ते श्रींच्या पादुकावर व श्रींच्या समाधीवर सामुदायिक अभिषेक करण्यात आला. दुपारी महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी मठाचे अध्यक्ष अँड. शरद फुटाणे, सचिव किसन झिपरे विश्वस्त अँड अनिल मंगरुळे, विजयकुमार गाजूल यांचे उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली.यानंतर रथोत्सवास सुरुवात झाली . वाजतगाजत निघालेली हि रथोत्सव मिरवणूक एवन चौक, विजय कामगार चौक, कारंजा चौक, मेन रोड, सेंट्रल चौक, फत्तेसिंह चौक, पागा चाळ मार्गे राजेराय मठात आली यावेळी विजयकुमार गाजूल यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दुसऱ्या दिवशी बेला समर्थ भजनी मंडळाच्या भजन गीताबरोबर गोपाळकाला करुन उत्सवाची सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदाम पाटील, प्रा. ओमप्रकाश तळेकर, अतुल जाधव, धनंजय गायकवाड,नागनाथ गजूला,अनंत शिंदे, महेश कलशेट्टी,श्रुती गोरे,उमेश सुतार, सतिश पाटील, नमित झिपरे, ओंकार दोडके, श्रीशैल जेऊरगी, रतिकांत पाटील, ईरणा करमल, सिद्धराम पुजारी, विशाल मंगरुळे, मल्लसिद्ध बिराजदार, अक्षय गव्हाणे व आंध्र भद्रावती पेठ मंडळातील भक्तांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!