चंद्रपुर : काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं आज दिल्लीतील वेदांता रुग्णालयात निधन झालं आहे. पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचं निकटवर्तीय तसेच कुटुंबियांनी वेदांता रुग्णालयात धाव घेत तब्येतीची माहिती घेतली होती. अखेर आज पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळं आता राज्यातील एकमेव काँग्रेस खासदाराचं निधन झाल्यामुळं महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
काही दिवसांपूर्वीच बाळू धानोरकर यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. परंतु आजारपणामुळं अंथरुणाला खिळलेल्या बाळू धानोरकर यांना वडिलांच्या अंत्यविधीला हजर राहता आलेलं नव्हतं. नागपुरातील अरिंहत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीतील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यानंतर आता त्यांचं पार्थिव शरीर सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने चंद्रपुरात आणण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या दुपारी चंद्रपुरातील वरोरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी दिली आहे.