दुधनी दि. ३१ : शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिका पर्यंत पोहचवण्यासाठी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालय वरील ताण कमी करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम दरवर्षी राबविणे गरजेचे असल्याचे मत मुख्याधिकारी अतिष वाळुंज यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
दुधनी शहर व परिसरातील सर्वसामान्य जनतेची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, तसेच जनतेला विविध योजनांचा लाभ लवकर मिळावा यासाठी आज तहसिल कार्यालय अक्कलकोट व दुधनी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दुधनी नगरपरिषद सभागृहात
‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्याधीकारी अतिष वाळुंज हे बोलत होते. यावेळी स्वामी समर्थ कारखान्याचे नुतन संचालक महेश पाटील, माजी नगरसेवक अतुल मेळकुंदे, मंडलाधिकारी धर्मसाले, कार्यालयीन अधिकारी चिदानंद कोळी, कर निरीक्षक आर. आर. गुंड, ईरय्या पुराणिक, बसवराज हौदे, बाबा टक्कळकी, तसेच कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्याधिकारी अतिष वाळुंज म्हणाले की, आज शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विभागाच्या माध्यमातून कमीत कमी कागदपत्रे, जलद मंजूरी व शासकीय निर्धारित शुल्कात नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळाला आहे. आज १५० पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा लाभ घेतल्याचे मुख्याधिकारी अतिष वाळुज यांनी सांगितले.
यावेळी कृषि विभागाच्या माध्यमातून तीन लाभार्थ्यांना जागेवरच ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. तसेच विविध शासकीय दाखले मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यापूर्वीच मुख्याधिकारी अतिष वाळुंज व दुधनी नगरपरिषदेच्या वतीने
जास्तीत जास्त नागरिकांनी ‘शासन आपल्या दारी’ या शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज शेवटच्या दिवशी दुधनी शहर व परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.