अक्कलकोट, दि.२३ : राज्यात भाजपचे सरकार जाऊन आगामी काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे त्यामुळे अक्कलकोटची जागा काँग्रेसला जिंकून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी
करावा,असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. शुक्रवारी,पटोले हे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट दौऱ्यावर आले होते.यानंतर काँग्रेस कार्यालयाला सदिच्छा भेट देत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.पुढे बोलताना पटोले म्हणाले, देशातील आणि राज्यातील भाजपचे सरकार
हे शांतता बिघडवण्याचे काम करत आहे.आज स्टेटसच्या कारणावरून राज्यात अनेक ठिकाणी दंगली होत आहेत. मारामारी होत आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
झाला आहे हे अशोभनीय आहे.चुकीच्या गोष्टीचे समर्थन काँग्रेस कधीही करत नाही परंतु कायदा हातात घेऊन जे लोक उघड उघड शांतता बिघडवण्याचे काम करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस पक्ष सातत्याने करत आहे पण पोलीस कोणाच्या दबावाखाली आहेत. नि: पक्षपाती
ते कारवाई का करत नाहीत, असा काँग्रेसचा सवाल आहे.राज्यात बेकारी वाढलेली आहे लोकांना अन्न खायला मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये हे लोक राज्यभर टिफिन बैठका घेत आहेत हे सरकार शेतकरी विरोधी आहे. मागच्या नऊ वर्षाच्या काळात भाजप सरकारने संविधानाचे तीन तेरा करण्याचे पाप केले आहे हे जनता कधीही विसरणार नाही. हुकूमशाहीचे राज्य आणले आहे. सामान्य जनता यांच्या कामकाजाला वैतागली आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे केवळ अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवून जनतेची घोर फसवणूक झालेली आहे. नेहमी काँग्रेसने देशासाठी काय केले असा प्रश्न विचारला जातो. सुईपासून ते रॅकेट पर्यंतची प्रगती ही काँग्रेसने केली आहे.काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही. मागच्या साठ वर्षात काँग्रेसने देशाला उभे करण्याचे काम केले आहे तर भाजपने
मागच्या नऊ वर्षात देशाला कर्जबाजारी केले आहे आणि मुठभर लोकांच्या स्वार्थासाठी देश विकायला काढला आहे त्यांना यांची जागा दाखवल्याशिवाय पर्याय नाही,
असेही ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी मनामधील न्यूनगंड कमी करावा आणि एकजुटीने लढून भाजपला नेस्तानाबुत करावे तरच देशाचे संविधान वाचू शकते.काँग्रेस हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे तर भाजप इव्हेंट करणारा पक्ष आहे यांना शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही.आज राज्यात शेतकऱ्यांच्या हजारो आत्महत्या झालेल्या आहेत पावसाचा पत्ता नाही खरीप हंगाम वाया जाण्याची वेळ आलेली आहे.यात शेतकऱ्यांना दमडीची मदत नाही सरकार शेतकऱ्यांविषयी खूप काही करत असल्याचे केवळ भासवीते पण प्रत्यक्षात काहीही नाही.राज्यातील सरकार घालवण्यासाठी मी अक्कलकोटला आलोय. केंद्रात व राज्यात जुलमी सरकार आलेले आहे.सत्ता उलथविण्यासाठी श्री स्वामी समर्थांना साकडे घातले असल्याचे शेवटी ते म्हणाले.प्रारंभी काँग्रेस कार्यालयानंतर अक्कलकोट काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी व शहराध्यक्ष रईस टिनवाला यांनी पटोले व अन्य मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला.यावेळी एबी ग्रुपचे अतिक बागवान,अजीम अत्तार यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील, तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे,काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष शितल म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते,विजयकुमार हत्तुरे, पंडित सातपुते, अभिराज शिंदे,लाला राठोड,
सिद्धार्थ गायकवाड,मुबारक कोरबू,मेनोद्दीन कोरबू,शिवराज स्वामी,काशिनाथ कुंभार, सरफराज शेख,
शबाब शेख,अलिबाशा अत्तार, सद्दाम शेरीकर, रोहिदास राठोड,विश्वनाथ हडलगी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट दिली तसेच ग्रामदैवत हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले आणि शुभेच्छा दिल्या.
चौकट :-
काँग्रेसच्या रॅलीने
वेधले लक्ष
सोलापूर रोडवरील हॉटेल प्रेसिडेंटजवळ शेकडो कार्यकर्त्यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात स्वागत केले आणि अक्कलकोट शहरातून पटोले यांच्या समवेत मोटरसायकल रॅली काढत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह
पाहायला मिळाला.
लवकरच काँग्रेसच्या
तालुकानिहाय जाहीर सभा
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत.दोन दिवसात त्याचे राज्य स्तरावर नियोजन होईल.प्रत्येक तालुक्यात काँग्रेस पक्ष तालुका निहाय जाहीर सभा घेऊन शेतकरी विरोधी सरकारचा पाढा वाचणार आहे.त्यावेळी मी पुनः अक्कलकोटला येणार आहे.
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष