ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गुरुपौर्णिमेदिवशी अक्कलकोटमध्ये लाखो भावीक स्वामी चरणी नतमस्तक !

अक्कलकोट,दि.३ : अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी महाराज की जयच्या जयघोषात लाखो भाविकांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.दिवसभर अक्कलकोटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.दर्शन रांग किमान एक ते दीड किलोमीटर दिसून आली.
कोरोना नंतर प्रथमच उच्चांकी गर्दी झाली तरी मंदिर समितीने उत्तम दर्शनाची व्यवस्था केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.गुरु पौर्णिमेचा हा उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला.दत्त अवतारी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे गुरूंचे गुरु, सदगुरुंचे गुरु, त्रैलोक्याचे नाथ, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची महिमा म्हणजे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय.या मंदिरातील वटवृक्षाखाली बसून स्वामी समर्थांनी अनेक भाविकांना मार्गदर्शन करत त्यांच्या जीवनातील संकटांचे तारणहार बनले आहेत.त्यामुळे गुरुस्थान म्हणून स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या या वटवृक्ष मंदिराकडे पाहण्याचा भाविकांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे हजारो स्वामीभक्त दिवसभर स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केल्याने गुरु-शिष्य भेटीची ओढ काय असते याची प्रचिती आज गुरूपौर्णिमेदिवशी मंदिर समितीसह समस्त अक्कलकोटकरांनी अनुभवली.गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचे पूजनीय दिवस, अशा या पूजनीय दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेदिवशी स्वामींचे दर्शनास भाविक विशेष महत्व देत असून दिवसभरात असंख्य भाविकांनी या पावन दिवशी स्वामींचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले. मंदिर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिराचे पुरोहित व चोळप्पा महाराजांचे वंशज मोहन पुजारी, मंदार पुजारी यांच्या हस्ते पहाटे ५ वाजता काकड आरती तर दुपारी ११:३० वाजता नैवेद्य आरती संपन्न झाली. पहाटे ५ वाजता मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आले. नैवेद्य आरतीनंतर सर्व
स्वामी भक्तांना देवस्थानच्यावतीने प्रसाद
वाटप करण्यात आले.गुरूपौर्णिमेनिमित्त स्वामी प्रसाद म्हणून देवस्थानच्यावतीने भाविकांना देण्यात येणाऱ्या भोजन महाप्रसादाचा दुपारी १२ ते ३ या वेळेत मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे असंख्य भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.यानिमित्त अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले,आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,आमदार निरंजन डावखरे, संजय शिंदे, अशोक बांदल, बाळासाहेब दाभेकर, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार
शिवशरण बिराजदार, सोलापूरचे धर्मादाय
आयुक्त सुनिता कंकणवाडी, सनदी लेखापाल एस.आर.मर्दा, चला हवा येऊ द्या फेम हास्य कलाकार भाऊ कदम, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी आदी मान्यवरांसह अनेक स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले.सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता चेअरमन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, अविनाश क्षीरसागर, रवी मलवे, प्रा.शिवशरण अचलेर, चंद्रकांत सोनटक्के, मोहन शिंदे, गिरीश पवार, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, मनोज कामनूरकर, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, ऋषिकेश लोणारी, शिवाजी यादव, महेश मस्कले, मनोज जाधव, अमर पाटील, संतोष पराणे आदिंसह देवस्थानचे कर्मचारी व सेवेकऱ्यांनी तसेच पोलीस प्रशासनाने सहकार्य केले.

 

दर्शनासाठी दीड
किलोमीटरची रांग

पहाटे ५ वाजता भाविकांची रांग नवशा मारुती मंदिरापर्यंत तर सकाळी ८ वाजता फत्तेसिंह चौक ते भारत गल्ली मार्गे गुरुमंदीरपर्यंत लांबली होती. ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांच्या वाढत्या ओघामुळे कायम राहिली. स्वामी भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे सर्व स्वामी भक्तांना विशेष दर्शन नियोजन रांगेतून दर्शनाकरीता सोडण्यात आले.

प्रत्येकाला स्वामी
दर्शनाची आस

दिवसागणिक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. गुरु पौर्णिमेला याचा प्रत्यय सर्वांना दिसून आला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्वामींच्या दर्शनाची आतुरता दिसून येत होती. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!