ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लम्पी आजाराने मृत जनावरांच्या पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू – मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

मुंबई, दि. १९ : लम्पी आजाराने मृत झालेल्या जनावरांच्या शेतकरी, पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शेतकरी, पशुपालकांना ही मदत मिळाली नाही, त्यांनाही लवकरच मदत देण्यात येईल, असे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यात लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या जनावरांच्या पालकांना अर्थसहाय्य न मिळाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री अमित देशमुख, नाना पटोले, हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात लसीकरण सुरू आहे. पशुधनाचा मृत्यू दर कमी राहिल यासाठी राज्य शासन उपाययोजना करत आहे. याकरिता आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांची संख्या वाढविण्यात येत आहे. ही भरती प्रक्रियासुद्धा अंतिम टप्प्यात असून लवकरच डॉक्टरांची यासाठी नियुक्ती करण्यात येईल. दुभत्या जनावरांच्या पशुपालकांना ३० हजार रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या पशुपालकांना २५ हजार रुपये आणि वासरांच्या पशुपालकांना १६ हजार रुपये अशी मदत दिली जाते. या मदतीत वाढ करावी अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!