गुरुशांत माशाळ
दुधनी दिनांक २८ जुलै २०२३ : हिंदू स्मशान भूमीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्मशान भूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील १५ ते १६ समाज बांधवांची कोंडी झाली आहे. मात्र रस्त्यासाठी वेळोवेळी लेखी निवेदन देऊनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे या १६ समाजातील नागरिक आक्रमक झाले आहेत.सद्य स्थितीत ज्या रस्त्यावरून अंत्यसंस्कारसाठी जाणारा रस्ता आहे तो मालकी असल्याने त्या रस्त्यावर त्या जमिनीच्या मालकांनी काटे टाकून रस्ता बंद केली आहे. यामुळे दुधनीतिल हिंदू स्मशान भूमीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. दुधानीचे माजी नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे यांच्या निधना दिवशीही असाच प्रसंग उद्भवला होता. त्यावेळी स्थानिक भाजपचे नेते आणि मुख्याधिकारी आतिष वाळूंज यांनी सदर जमिनीच्या मालकांकडे विनंती केल्यानंतर संबधीत जमीन मालकांनी स्मशान भूमीत जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला होता. त्यानंतर माजी नगराध्यक्ष इंगळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडला होता.
गुरुवारी रात्री वडार समाजातील श्रीमती रेणुका यल्लप्पा गोटे (वय – ३८) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर भाजीपाला मार्केट जवळील हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्याचे ठरविण्यात आले. मात्र मागील तीन-चार दिवसांपासून सलग पडत असलेल्या पावसामुळे स्मशान भूमीत जाणाऱ्या रस्त्यावर चिखलांचे साम्राज्य पसरले असून रस्ता निसरडा बनला आहे. यामुळे त्या निसरडत्या रस्त्यांमधून जायचं कसं हा प्रश्न उद्भवल्याने वडार समाजातील काही नागरिक आणि तरुणांनी नगरपरिषदे समोर सरण रचून रेणुका यल्लप्पा गोटे यांच्या पार्थिवावर दहनविधी करण्याचे ठरवून दहन विधीसाठी लागणारे साहित्य नगरपरिषदे समोर आणून ठेवला. त्यानंतर नगर परिषद कर्मचारी खडबडून जागे झाले. आणि याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस देखील नगरपरिषदेत पोहोचले. त्यानंतर इतर समाजातील नागरिक देखील नगर परिषदेत येऊन स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली. येत्या आठ दिवसांत स्मशानभूमीत जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार करून देण्यात येईल असे आश्वासन नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक चिदानंद कोळी यांनी दिल्यानंतर वडार समाजातील नागरिकांनी नगर परिषदे समोर दहनविधीसाठी रचलेला सरण हटवला.
स्मशान भूमीत जाण्यासाठी जो मंजूर रस्ता आहे तो रस्ता एका नाल्याच्या बाजूला आहे. त्या नाल्यामधून पावसाळ्यात सतत पानी वाहत असतो. यामुळे त्या नाल्यावर पूल बांधणे आणि रस्ता तयार करणे गरजेचे आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने दरवर्षी पावसाळ्यात हा प्रश्न समोर येत आहे. अन्यथा स्मशान भूमिलागत असलेल्या ज्यांची जमीन आहे त्या जमीनदारानां विचारात घेऊन त्या जमिनीच्या मालकांना मोबदला देऊन रस्त्यासाठी जितका जमीन लागणार आहे तेवढ जमीन संपादित करणे गरजेचे आहे. मात्र स्थानिक प्रशासन २५ ते ३० वर्षांपासून कुठल्याही ठोस भूमिका न घेतल्याने रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळला आहे.