ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नऊशे कोटींच्या रस्त्यांतून मिळाली रोजगाराला चालना;अक्कलकोट – सोलापूर रस्त्यामुळे रोजगाराच्या संधी

 

मारुती बावडे

अक्कलकोट,दि.१९ : रस्ते झाल्याशिवाय देशाचा विकास नाही असे नेहमी म्हटले जाते. याचा प्रत्यय आता अक्कलकोटकरांना येत आहे कारण अक्कलकोट ते सोलापूर सिमेंट काँक्रीट रस्ता झाल्यापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध उद्योगधंद्यांमध्ये मोठी वाढ झाली असून त्यामुळे रोजगारागाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि चालना देखील प्रत्यक्षात मिळत आहे.

दिवसेंदिवस याची संख्या वाढत चालल्याने
पुणे, मुंबई,नाशिक, धुळे हायवे सारखी स्थिती या रस्त्याची होऊ लागलेली आहे.अक्कलकोट पासून मुंबई पर्यंत सुसाट रस्ता असल्याने आजूबाजूला असलेल्या व्यवसायांना आता खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत असे म्हणायला हरकत नाही.केंद्रात भाजपचे सरकार येण्यापूर्वी काँग्रेसचे सरकार होते.त्याही वेळी रस्त्यांना महत्त्व दिले जात होते परंतु मोदी सरकार जेव्हा आले तेव्हा हा विषय आणखी प्राधान्याने हाताळत रोज हजारो किलोमीटरचे रस्ते हे पूर्ण केले जात आहेत.यात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा वाटा सिंहाचा आहे.खास करून त्यांनी राज्यातील तीर्थक्षेत्रे एकमेकांना चांगल्या रस्त्याने जोडण्याचे स्वप्न पुढे ठेवून त्या दृष्टीने गती देत कामे वेगाने पूर्ण केली त्यात खास करून पंढरपूर ते सोलापूर, सोलापूर ते अक्कलकोट, अक्कलकोट ते गाणगापूर आणि तुळजापूर ते अक्कलकोट अशा सर्व प्रकारच्या तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्यां रस्त्यांचा यात समावेश आहे.हे रस्ते होत असताना केवळ रस्ते झाले असे झालेले
नाही तर प्रत्येक वीस फुटावर ,पंचवीस फुटावर ,पन्नास फुटावर मोठ्या प्रमाणात हॉटेल्स,ढाबे, वाहना संबंधीचे इतर व्यवसाय हे मोठ्या प्रमाणात वाढले गेले.या माध्यमातून शेकडो लोकांना रोजगार मिळाला आणि त्यामाध्यमातून आर्थिक उलाढाल होऊ लागली ही वस्तुस्थिती आहे.पूर्वी याच रस्त्यावर तीन वर्षांपूर्वी आजूबाजूला शेती होती.कोणीही उद्योग उभा करण्याचे धाडस करत नव्हता आज वळसंग टोलनाक्याच्या ठिकाणी एखाद्या गावासारखी स्थिती आहे.हा बदल केवळ चांगल्या रस्त्यामुळे झालेला आहे त्यापुढेही वळसंग ते अक्कलकोट आणि वळसंग ते सोलापूर दरम्यान लॉजिंग व इतर व्यवसाय उभे करून लाखो रुपयांची गुंतवणूक या व्यावसायामध्ये करत आहेत. या पुढच्या काळातही मोठी भर पडेल यात शंका नाही.अक्कलकोट ते सोलापूर हा रस्ता ३९ किलोमीटरचा असून या रस्त्यावर केंद्र सरकारने तब्बल ९०० कोटी रुपये खर्च केले आहेत.पूर्वी हा रस्ता दुपदरी होता
त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात व्हायचे.चौपदरीकरणामुळे देखील यात घट झाली आहे.लिंबीचिंचोळी,तोगराळी, कोन्हाळी, कर्जाळ या गावांनी मोठे ब्रिज झाल्याने ही गावे देखील लक्ष केंद्रित झाले आहेत. ही गावे पूर्वी रस्त्याच्या लगत होती आता ब्रिज झाल्याने ती खाली गेली आहेत आणि रस्ता वर झालेला आहे.काही गाड्या वरून जातात काही गाड्या खालून जातात अशी पण स्थिती आहे पण एक मात्र नक्की रस्त्याकडेला असलेल्या कुंभारी,तोगराळी, लिंबीचिंचोळी,वळसंग, कर्जाळ या गावांना याचा मोठा फायदा होत आहे ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.

 

दोन्ही तीर्थक्षेत्रांना
लाभ

अक्कलकोट – सोलापूर रस्ता
चौपदरीकरण झाल्यामुळे मुंबई,
पुणेच्या भाविकांना थेट या रस्त्यावरून अक्कलकोटला येणे सोपे झाले आहे. अक्कलकोटपासून जवळच तुळजापूर
आणि गाणगापूर ही दोन तीर्थक्षेत्र आहेत.त्यामुळे अक्कलकोटला येणारा प्रत्येक भाविक हा या दोन्ही ठिकाणी देव दर्शनासाठी जातोच. त्यामुळे अक्कलकोट
हे भविष्यकाळात केवळ रस्त्यामुळे
मध्यवर्ती ठिकाण होईल.

भाविकांच्या संख्येत
दुप्पटीने वाढ

मागच्या पाच वर्षाच्या तुलनेत गेल्या एक ते दीड वर्षात भाविकांची संख्या दुपटीने वाढली आहे त्यामुळे व्यवसाय वाढीला देखील चालना मिळाली आहे मुख्य म्हणजे चांगल्या रस्त्यामुळे गाड्या सुसाट येत आहेत त्यात रस्त्याच्या आजूबाजूला सुविधा उपलब्ध झाल्यामुळे भाविकांतून ही समाधानाची भावना व्यक्त
होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!