बीड : वृत्तसंस्था
राज्यात सोयाबीनची मोठी आवक वाढत असल्याने बीडच्या माजलगाव शहरातील मोंढा मार्केटमध्ये गेल्या दीड महिन्यात तब्बल ६२ कोटी रुपयांचे सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. या काळात १ लाख ३६ हजार १०० क्विंटल इतक्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांनी दिली.
पाऊस कमी झाल्यामुळे यंदा बीड जिल्ह्यात दुष्काळ पडलाय. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनला काय भाव मिळत आहे? याची परवा न करता सोयाबीन विक्री केली. त्यामुळे मागील दीड महिन्यात माजलगावच्या मोंढ्यात १ लाख ३८ हजार १०० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. सुरुवातीला ४ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी भावात विकणाऱ्या सोयाबीनला हळूहळू भाव चांगला मिळू लागला. त्यामुळे शेतकरी सोयाबीन घरी ठेवण्याऐवजी तात्काळ विक्री करत आहेत.