वाराणसी : वृत्तसंस्था
देव दिवाळीला वाराणसीतील श्री काशी विश्वनाथ मंदिर परिसर २७ नोव्हेंबरला ११ टन फुलांनी सजवण्यात येणार आहे. सरकारी निवेदनातून ही माहिती मिळाली आहे. यासोबतच उत्तर प्रदेश सरकारतर्फे सोमवारी संध्याकाळी श्री काशी विश्वनाथ धामच्या गंगा गेटवर भव्य लेझर शो आयोजित केला जाणार आहे. पर्यटकांना विश्वनाथ धाम, काशी आणि भगवान शिवाची धार्मिक कथा आणि गाथा जाणून घेता येणार आहेत.
श्री काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वर्मा यांनी सांगितले की, धाम, काशीचे महत्त्व आणि कॉरिडॉरच्या बांधकामाशी संबंधित माहिती गंगा गेटवर लेझर शोद्वारे प्रदर्शित केली जाईल. निवेदनानुसार, लेझर शोचा कालावधी पाच मिनिटांचा असेल, जो पुन्हा पुन्हा केला जाईल. यानुसार लेझर शो लोकांना नौकाविहार करणाऱ्या आणि घाटावर उपस्थित असलेल्या लोकांना आरामात पाहता येईल, अशा पद्धतीने करण्यात येणार आहे. काशीच्या जगप्रसिद्ध देव दिवाळीनिमित्ताने वाराणसीला येणारे पर्यटक श्री काशी विश्वनाथ धामला नक्कीच भेट देतात. अशा परिस्थितीत भाविकांच्या स्वागतासाठी बाबांचा दरबार आकर्षक देशी-विदेशी फुलांनी सजवण्यात येणार आहे. विशाखापट्टणममधील एक व्यापारी ११ टन फुलांनी बाबांचे धाम सजवत आहे. महादेवाचे धाम सजवण्यासाठी कोलकाता, बंगळुरू आणि विदेशातून फुले येत असल्याचेही त्यांनी सांगितले.