ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुचाकीला पिकअपची जबर धडक : पती-पत्नी ठार !

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिह्यातील करमाळा शहरातील मनोज काळे (वय ४७) आणि त्यांच्या पत्नी पुष्पा काळे (वय ४२) या दाम्पत्याचा सोमवारी सायंकाळी सालसेनजीक झालेल्या अपघातात दुर्देवी अंत झाला. वैद्यकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी सकाळी नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला. यासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयासमोर आणि करमाळा पोलीस स्टेशनसमोर नातेवाइकांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या मांडला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी माढा तालुक्यातील बारलोणी येथील नातेवाइकांना भेटून काळे दाम्पत्य सायंकाळी सहाच्या सुमारास करमाळ्याच्या दिशेने मोटारसायकलवरून निघाले होते. सालसे गावाच्या पुढे महावितरणच्या जुन्या सबस्टेशन समोर त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून भरधाव येणाऱ्या पिकअपने जोराची धडक दिली. या अपघातात पुष्पा काळे यांचा जागीच अंत झाला, तर मनोज काळे यांना बार्शी येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या अपघातातील पिकअप (क्र. एमएच ४२ – एम ७३१८) चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काळे दाम्पत्याच्या निधनाचे वृत्त समजताच करमाळा उपजिल्हा रुग्णालयासमोर आप्तेष्टांनी गर्दी केली. करमाळा उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी रात्री उशिरा मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाइकांनी नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, संजय सावंत, सुनील सावंत, अरुण जगताप यांनी नातेवाईक आणि पोलीस यांच्यात समन्वय घडवून आणत याबाबतचा तणाव आटोक्यात आणल्यानंतर मंगळवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!