ध्यास विश्वसार्ह बातमीचा

२०२४ मध्ये भारत भाजपापासून मुक्त होणार : संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे मतदान नुकतेच झाले असून या निवडणुकीचे ३ डिसेंबर रोजी निकाल हाती येणार आहेत. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज गुरुवारी जाहीर झाले. विविध संस्थांनी अंदाज व्यक्त करत एक्झिट पोल जाहीर केला. यावरून संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राजस्थानसह चारही राज्यात काँग्रेसची सत्ता येणार आहे. तर काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना एक्झिट पोलमुळे घाम फुटल्याचे म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

प्रसार माध्यमांनी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाबाबत विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देत संजय राऊत म्हणाले की, ज्या पाच राज्यांत निवडणुका झाल्या ती पाच राज्य अत्यंत महत्त्वाची आहेत. भाजपाने २०१४ पासून काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती. पण आता त्या काँग्रेसने, राहुल गांधींनी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा करणाऱ्यांना घाम फोडला आहे, असा हल्लाबोल राऊतांनी केला.
तर, देशाच्या पंतप्रधानांना आठ आठ दिवस एका राज्यात राहावे लागत आहे. गृहमंत्र्यांना संपूर्ण देश वाऱ्यावर सोडून निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी फिरावे लागत आहे. हे काँग्रेसमुक्त भारतच लक्षण नसून २०२४ पासून भारताला भाजपपासून मुक्ती मिळणार आहे. मला पूर्ण खात्री आहे की, राजस्थाऩसह चारही राज्यांत काँग्रेसचे सरकार बनेल, म्हणजेच इंडिया आघाडीचे सरकार बनेल. मिझोराममध्ये सुद्धा प्रादेशिक पक्षासोबत काँग्रेस सत्तेत येईल. काँग्रेसचे चांगले दिवस आले आहेत. काँग्रेसचा विजय हा इंडिया आघाडीचा विजय आहे. इंडिया आघाडीतील कोणतेही पक्ष निवडणुकीत नसले तरी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने हे इंडिया आघाडीसाठी महत्त्वाचे असल्याचे मत संजय राऊत यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!