नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही दिवसापासून विधासभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून आज अनेक ठिकाणी निकाल लागण्याची मोठी शक्यता आहे. यात आता राजस्थान विधानसभा निवडणुकीचे ट्रेंड पुढे येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी लढत आहे. सध्या भाजप 91 जागांवर आणि काँग्रेस 96 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर उमेदवार 5 जागांवर पुढे आहेत. पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीनंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनद्वारे (ईव्हीएम) मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
लक्ष्मणगड मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंग डोटासरा पहिल्या फेरीत पिछाडीवर आहेत. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया हेही आमेर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. सरदारपुरा मतदारसंघातून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आघाडीवर आहेत. विद्याधर नगर मतदारसंघातून दिया कुमारी आघाडीवर आहेत. डीग-कुम्हेर मतदारसंघातून विश्वेंद्र सिंह 1269 मतांनी आघाडीवर आहेत.
दुपारी 12 वाजेपर्यंत पुढचे सरकार कोणाचे होणार हे चित्र जवळपास स्पष्ट होईल. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या 199 जागांसाठी मतदान झाले होते. श्रीकरणपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गुरमीत कुन्नर यांच्या निधनामुळे तेथे निवडणूक झालेली नाही. या विधानसभा निवडणुकीत 1863 उमेदवार रिंगणात आहेत.