जळगाव : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौऱ्यावर निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. एकट्या छगन भुजबळ यांचे ऐकून सरकारने आमच्यावर कारवाई केली, तर त्याचे तीव्र परिणाम सरकारला भोगावे लागतील, असे ते म्हणालेत. ते जळगाव येथील सभेत बोलत होते. मनोज जरांगे म्हणाले की, मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आम्ही सरसकट आरक्षण घेणारच. सरकारच नव्हे तर कुणीही आमच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न करु नये. सरकारी नोंदी सापडूनही आम्हाला आरक्षण दिले नाही, तर गाठ आमच्याशी आहे. हा तुम्हाला जाहीर इशारा आहे.
आम्हाला राज्यात शांतता हवी आहे. त्यामुळे सरकारने आपल्या आश्वासनानुसार सर्व गुन्हे मागे घ्यावेत. कार्यकर्त्यांचे अटकसत्र थांबवावे. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांची आम्ही पाठराखण करणार नाही. पण निष्पाप लोकांना गुंतवणे थांबले पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
एकट्या छगन भुजबळ यांचे ऐकून आमच्यावर कारवाई झाली, तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील. यापुढे तुम्ही त्यांच्याच गळ्यात हात टाकून फिरा. मराठा समाजाच्या दारातही उभे राहू नका. 24 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आपले ठरले आहे. त्यानुसार तुम्ही तातडीने त्याची अंमलबजावणी करा. त्याच्या (भुजबळ) सुरात सूर मिसळू नका. तुम्ही त्याच्या दबावाला बळी पडून अन्याय केला तर मराठे 55 टक्के आहेत हे विसरु नका, असेही मनोज जरांगे पाटील यावेळी सरकारला इशारा देताना म्हणाले.