नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या तेंगनौपाल जिल्ह्यात सोमवारी अतिरेक्यांच्या दोन गटांत उडालेल्या चकमकीत १३ ठार, तर अनेक जण जखमी झाले. कुकी समाजाचा प्रभाव असलेल्या लीथू गावात दुपारच्या सुमारास ही चकमक उडाली. म्यानमारमध्ये जाणाऱ्या एका अतिरेकी गटाच्या सदस्यावर या क्षेत्रात वर्चस्व असलेल्या दुसऱ्या अतिरेकी गटाने घात लावून हल्ला केल्यांनतर चकमक उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाचे पथक या भागात दाखल झाले.
यावेळी त्यांना चकमकीत ठार झालेल्या अतिरेकी गटाच्या १३ सदस्यांचे मृतदेह आढळून आले. या लोकांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र हे अतिरेकी स्थानिक रहिवासी नसल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मणिपूर राज्यात ३ मेपासून मैतई व कुकी समाजात संघर्ष सुरू आहे. या संघर्षात आतापर्यंत १८२ लोक ठार झाले असून, ५० हजारांहून अधिक नागरिकांना स्वतःचे घर सोडावे लागले. यापैकी बहुतांश लोक अनेक महिन्यांपासून मदत शिबिरांमध्ये राहत आहेत. या राज्यात हिंसाचार उसळल्यापासून इंटरनेट बंद आहे. मात्र रविवारी मणिपूर सरकारने राज्यातील काही क्षेत्र वगळता संपूर्ण राज्यात १८ डिसेंबरपर्यंत इंटरनेट सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. कायदा व सुव्यवस्थेत होत असलेली सुधारणा व इंटरनेट बंद असल्याने लोकांना येणाऱ्या समस्यांचा विचार करून राज्य सरकारने ही सूट दिली होती.