नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर सुरु असतांना आता बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उदयास आलेले मिचाँग चक्रीवादळ आज दुपारी आंध्र प्रदेशातील बापटलाजवळ नेल्लोर-मछलीपट्टनम दरम्यान धडकणार आहे. हवामान विभागाच्या मते, या काळात 90 ते 110 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात हाय अलर्ट आहे. राज्य सरकारने तिरुपती, नेल्लोर, प्रकाशम, बापटला, कृष्णा, पश्चिम गोदावरी, कोनासीमा आणि काकीनाडा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. या 8 जिल्ह्यांमध्ये NDRF आणि SDRF च्या प्रत्येकी 5 टीम तैनात आहेत.
मंगळवारी तामिळनाडूमध्ये पावसाचा जोर कमी झाला. सोमवारच्या वादळामुळे चेन्नईतील अनेक भाग जलमय झाले होते. रस्त्यांवर गाड्या तरंगताना दिसत होत्या. विमानतळावर भरलेल्या पाण्यात विमान उभे राहिले. चेन्नई, तामिळनाडूमध्ये या वादळाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. चेन्नईमध्ये रविवार, ३ डिसेंबर सकाळपासून सुमारे ४००-५०० मिमी पाऊस झाला आहे. तामिळनाडूच्या पाणीपुरवठा मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, चेन्नईमध्ये 70-80 वर्षांत पहिल्यांदाच इतका पाऊस झाला आहे. आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे आतापर्यंत 204 ट्रेन आणि 70 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये 21 NDRF पथके तैनात आहेत. याशिवाय तटरक्षक दल, लष्कर आणि नौदलाची जहाजे आणि विमाने स्टँडबायवर ठेवण्यात आली आहेत.